डोळ्यात चटणी टाकून महिलेला लुटणारा भामटा गजाआड; फलटण ग्रामीण पोलिसांची कामगिरी; पर्यटनाला जाण्यासाठी रचला होता कट

by Team Satara Today | published on : 14 August 2026


फलटण : शेतातून काम करून घराकडे जाणार्‍या महिलेच्या डोळ्यात चटणी फेकून सोन्याचे दागिने लांबवणार्‍या चोराला फलटण ग्रामीण पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. पर्यटनासाठी केरळला फिरायला जाण्याच्या हौसेपोटी आरोपीने हा धक्कादायक प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे.

अथर्व उर्फ चिन्मय छगन सुतार (वय 20 वर्षे, रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विडणी गावाच्या हद्दीत पीडित महिला शेतातील काम आटोपून घरी परतत असताना, निर्मनुष्य जागेचा फायदा घेत ऊसाच्या शेतात लपलेल्या सुतार याने मागून येऊन तिच्या डोळ्यात चटणी टाकली. महिला वेदनेने विव्हळत असताना तिच्या गळ्यातील सोन्याचा दागिना जबरीने हिसकावून तो पसार झाला. याप्रकरणी पीडित महिलेने तात्काळ फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने दोन स्वतंत्र तपास पथके तयार केली. गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी विडणी गावातीलच संशयित अथर्व सुतार याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने आपण कोणतीही चोरी केली नसल्याचा कांगावा करत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. अधिक चौकशी दरम्यान, मला केरळ येथे फिरायला जायचे होते आणि त्यासाठी लागणार्‍या पैशांची जुळवाजुळव करण्यासाठीच हा गुन्हा केला, अशी धक्कादायक कबुली सुतार याने दिली.

या कारवाईत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, तसेच पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस, तुषार नलवडे आणि अविनाश शिंदे यांच्या पथकाने सहभाग घेतला. सुतार याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पॉश ॲक्टची अंमलबजावणी करण्याचे महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांचे आवाहन; अंमलबजावणी न करणा-या कार्यालयांना कारणे दाखवा नोटीसा
पुढील बातमी
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दिव्यांग बांधवांचे खड्डे भरो आंदोलन; सातार्‍याला दिला संवेदनशीलतेचा संदेश

संबंधित बातम्या