मुंबई : विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेते तातडीने जाहीर केले पाहिजेत. सरकार आम्हाला कायदे दाखवत असेल, तर आधी उपमुख्यमंत्रिपद रद्द करा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. संविधानात उपमुख्यमंत्रिपदाची तरतूद नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात इनकमिंग सुरू झाले आहे. शनिवारीही मातोश्री निवासस्थानी पुण्यातील भाजप आणि अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन, विरोधी पक्षनेत्याचा अभाव, मतदार याद्यांतील सावळा गोंधळ, भाजपची कथित दंडेलशाही आदी विविध मुद्द्यांवरून जोरदार हल्ला चढवला. निवडणुकीमध्ये गडबड घोटाळा सुरू असून सत्ताधाऱ्यांमध्ये मारामारी सुरू आहे. बुथ कॅप्चरिंगच्या ऐवजी अख्खी निवडणूक कॅप्चर करण्याचा उद्योग सुरू आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरून सरकारवर निशाणा साधला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाला वर्षभर विरोधी पक्षनेता नसण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे सरकार विरोधी पक्षनेत्याला का घाबरत आहे, असा प्रश्नही ठाकरे यांनी विचारला. महायुतीमधील तिन्ही पक्षांचे नेते एकच आहेत. त्या पक्षांचे नाव व निशाणी वेगळी असली तरी त्यांचा मालक एकच असून त्या भाजपच्या ‘बी’ टीम आहेत, असा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. भाजपचा ॲनाकोंडा शिंदे गट व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गिळल्याशिवाय राहणार नाही, असेही ठाकरे म्हणाले. शाकाहारी असाल तरच घर घेता येईल, असे म्हणत मराठी माणसाला मीरा-भाईंदरमध्ये घर नाकारले गेले आहे, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता उद्धव ठाकरे कडाडले, शाकाहाराची अट घालून ज्यांनी घर नाकारले आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तडीपार करायला हवे. कोणीही असो, कोणाच्याही खाण्यावरून आणि मराठी आहे म्हणून घर नाकारले जात असेल तर हा जातीय व भाषिक वाद फैलावत आहे. त्याला तुरुंगात टाका, अशी मागणही ठाकरेंनी यावेळी केली.