मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती

मायणीच्या डॉ. मानेंच्या संशोधनाला मिळालं अमेरिकन पेटंट

कलेढोण : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील  संशोधक प्रा. डॉ. राजाराम माने आणि डॉ. झोयेक शेख यांच्या टीमने एक महत्त्वपूर्ण शोध लावण्यात यश मिळवले आहे. ज्यामुळे मानवी मूत्रापासून कार्बन पदार्थाची निर्मिती करून याच कार्बन पदार्थाचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात येणार आहे. या संशोधनाला अमेरिकन पेटंट प्राप्त झाले असून, हे पेटंट स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्राप्त झाले आहे.

मायणीचे सुपुत्र प्रा. डॉ. राजाराम माने यांनी भौतिकशास्त्रात पीएचडी प्राप्त केल्यानंतर कोरियाच्या हॅनयांग विद्यापीठात पोस्ट डॉक्टरेट फेलो म्हणून काम केले. ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, ऑक्सफर्ड, युकेच्या रिसर्च फॅकल्टिवरही होते. सन २०१० पासून ते स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड येथे प्राध्यापक आणि पुसान राष्ट्रीय विद्यापीठ, कोरियाचे अभ्यागत प्राध्यापक आहेत.

त्यांनी ३०० हून अधिक संशोधन लेख लिहिले आहेत. त्यांच्या प्रमुख संशोधनामध्ये ऊर्जा रूपांतरण आणि स्टोअरेज डिव्हाईस तंत्रज्ञानासाठी नवीन नॅनोस्ट्रक्चर्सचे संश्लेषण समाविष्ट होते. याद्वारे मानवी मूत्रामध्ये असलेल्या कार्बनचा वापर करून हायड्रोजन निर्मिती करून हा कार्बन पदार्थ ऊर्जा निर्मितीसाठी उपयोगी ठरणार आहे. याच शोधाचे पेटंट किंग साऊद विद्यापीठ, सौदी अरेबिया यांच्याकडून वित्तीय साहाय्य घेऊन प्राप्त केले आहे.

पेटंट मिळवलेल्या संशोधनाच्या मुख्य अंशांमध्ये, मानवी मूत्रातून कार्बन नॅनो मटेरिअल तयार करणे, तसेच त्याचा वापर ऊर्जा निर्माण करण्यासाठी कसा केला जाऊ शकतो. या संशोधनाच्या माध्यमातून प्रा. डॉ. राजाराम माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक अभिनव पद्धतीने ऊर्जा निर्माण करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. या यशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि प्राध्यापक कुंभारखाणे यांनी डॉ. माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. सध्या डॉ. माने आणि त्यांच्या गटाचे संशोधन ‘ट्यालॉईड’ या पदार्थावर चालू आहे.

या पदार्थाच्या कार्बनसोबत होणाऱ्या संयोगाचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी होऊ शकतो. हे संशोधन भविष्यात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठू शकते, ज्यामुळे ऊर्जा उत्पादनाच्या क्षेत्रात नवा बदल होईल. डॉ. माने यांचा भारतीय मराठी विज्ञान परिषदेत वैशिष्ट्यपूर्ण संशोधक म्हणून गौरवण्यात आले. त्यांच्या संशोधनाच्या क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना जागतिक दर्जाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कार्बन नॅनो मटेरियलचा वापर हायड्रोजन निर्मितीसाठी करण्यात आला असून, ज्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग इलेक्ट्रिक वाहनांसाठी होऊ शकतो. हायड्रोजन आधारित ऊर्जा प्रणालीचा वापर पर्यावरणास अनुकूल असून, त्याचा मोठा फायदा ऊर्जा क्षेत्रात होणार आहे. संशोधनासाठी किंग साऊद विद्यापीठाचे साहाय्य व आर्थिक पाठबळ संशोधनासाठी महत्त्वपूर्ण ठरले. - प्रा. राजाराम माने, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

मागील बातमी
मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण
पुढील बातमी
फडणवीसांच्या नेतृत्वात दावोसमध्ये महाराष्ट्राचा विक्रम

संबंधित बातम्या