जालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही हतबल झाला होता, रडकुंडीला आला होता, याच मराठ्यांनी तुम्हाला गादीवर बसवलंय. मात्र आता तुम्ही मराठ्यांबाबत बेईमान होऊ लागला आहात. तुम्ही माझं काहीही करू शकत नाही. पण तुमची मस्ती जायला तयार नसल्याचे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका केली आहे.
सागर बंगल्यावरून मुलीच्या परीक्षेसाठी वर्षावर जाता येत नाही तुम्ही म्हणाले. तुम्हाला तुमच्या पोरीच्या भवितव्याची चिंता आहे. इकडे आमच्या पोरांचे मुडदे पडायला लागले आहेत. आमचं उपोषण खोटं बोलून उठवलं, आम्ही तुमचं म्हणणं मानल होतं. पण तुम्ही गोड बोलून आमचा काटा काढला. मराठा आरक्षणासाठी आज 4 आत्महत्या झाल्या. तुमचं लेकरू बघता तसे राज्यातील इतर लेकरांना बघा, मुलीसाठी नजीकच्या बंगल्यात राहायला जात नाही. सागरवरून वर्षा बंगल्यावर जाता येत नाही. तुमच्या मुलीचं ऐकून ज्याप्रमाणे सागर बंगला सोडत नाही, जसं तुझं लेकरु बघतो तसं इतर लेकरांना ही बघा, असा घणाघातही मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यावर केला आहे.
आता आपण रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. राज्यातील मराठे कणखरपणे लढाई लढणार आहेत. आज 12 -13 दिवस झालेत. देवेंद्र फडणीस यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यामार्फत निरोप दिला होता की, आम्ही तात्काळ मागणी मान्य करू. मात्र आज त्या घटनेला 13 दिवस झाले आहेत. पण अजून शिंदे समिती सक्रिय केली नाही, प्रक्रिया अजून सुरू केली नाही, तसेच गॅजेट सुद्धा घेतलं नाही. SEBCचा विषय होता त्याचा निर्णय आजुन घेतला नाही. त्यामुळे केवळ उपोषण सोडण्यापर्यंत हे असं करत आहेत का? सरकार जाणून बुजून फसवणूक करायला लागलंय. त्यामुळे येत्या 15 तारखेपासून आम्ही अंतरवालीसराठी येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू करतोय. याची दखल घेतली नाही तर आमरण उपोषण करू, असा निर्धार करत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री झाला म्हणून तुम्हाला कोणीच बोलायचे नाही का? दहशतवादी अड्डे चालवतो का? मला हलक्यात घेऊ नका. आता आम्ही रस्त्यावर लढणार असल्याचा निर्धार ही मनोज जरांगे यांनी केला आहे.सत्ता आल्यापासून यांनी काय केलं. आज पावणेदोन वर्षापासून हेच गृहमंत्री आहे. तरीही केसेस मागे नाहीत. पण मुख्यमंत्री आता हे चालणार नाही. धनंजय मुंडे यांच्यासारखी तुमची जी टोळी आहे, तिला पण फिरू देणार नाही. तुम्ही आमच्या समाजाचा अपमान करणार असाल तर तुम्हाला सोडणार नाही. सत्ता आणि दरारा इथे मराठ्यांचा आहे. मराठ्यांनी ठरवले तर जगाची मुंगी सुद्धा हलणार नाही. असेही मनोज जरांगे म्हणाले.