मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन

(दुसरे वाचन प्रेरणा साहित्य संमेलन २०२५ होणार २३ जानेवारीला)

सातारा : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडून ट्विटर या सामाज माध्यमावर दि. २३ जानेवारी रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळात दुसरे वाचन प्रेरणा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ट्विटर सारख्या सामाजिक माध्यमावर महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित करण्यात येणारे हे अभिनव संमेलन असेल.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे हे या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा यानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

वाई विश्वकोश कार्यालयातील संपादकीय विभाग व प्रशासकीय विभागाकडून या कार्यक्रमांचे संयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात मराठी विश्वकोशाचे विद्याव्यासंगी डॉ. जगतानंद भटकर हे मराठी विश्वकोश परिचय बरोबर प्रास्ताविक आणि भूमिका मांडणार आहेत. डॉ. अजय देशपांडे, डॉ.भास्कर पाटील, समाधान महाजन आणि तुषार चांदवडकर इत्यादी सुप्रसिद्ध लेखक आपले विचार या संमेलनात मांडतील. मराठी विश्वकोशाची उपयुक्तता, मराठी विश्वकोश आणि स्पर्धा परीक्षा आणि अभिजात मराठी भाषा या विषयांवर या संमेलनात विचारमंथन होईल. ट्विटर या माध्यमाद्वारे लेट्स रीड इंडिया व पुस्तक आणि बरेच काही या संस्था वाचन संस्कृतीचा जगभर प्रचार करीत आहेत. या संस्थांचे सन्माननीय सदस्यही या संमेलनात सहभागी असतील.

या साहित्य संमेलनाची पत्रिका माध्यमांवर प्रकाशित करताच हजारो लोकांनी या कार्यक्रमास प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या मराठी विश्वकोशाकडून आयोजित या संमेलनाची माध्यमांत चर्चा आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे, मराठी विश्वकोशाचे सचिव डॉ. शामकांत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई विश्वकोश कार्यालयातील संपादकीय विभाग व प्रशासकीय विभागाकडून या कार्यक्रमांचे संयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा मराठी वाचक, विद्यार्थी यांनी लाभ घेण्याचे आवाहन विश्वकोश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


मागील बातमी
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर
पुढील बातमी
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग

संबंधित बातम्या