सातारा : शहरातील अल्पवयीन मुलीसह विविध ठिकाणी महिला-मुलींसमोर असभ्य वर्तन करणार्या विकृताला गजाआड करण्यात सातारा शहर डीबी पथकाला यश आले आहे. विनोद मोहन कामटे (वय 40 वर्ष, रा. सैदापूर जि. सातारा मूळ गाव जातेगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या विकृताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरात असणार्या खाजगी क्लासमध्ये शिकणार्या एका अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणार्या अनोळखी व्यक्तीबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात माहिती प्राप्त झाल्याने सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी तातडीने डी बी पथकास संबंधिताचा शोध घेण्याचा आदेश दिला होता. संबंधिताचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घेत असताना त्याने या घटनेनंतर दोन ते तीन विविध ठिकाणी महिलांसमक्ष लैंगिक चाळे केल्याचे तसेच छेड काढल्याचे फुटेजवरून स्पष्ट झाले होते.
याबाबत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांना माहिती देण्यात आली असता वरिष्ठांनी ही व्यक्ती आणखी घृणास्पद कृत्ये करण्यापूर्वीच त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांचे मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे सातारा शहर डी.बी. पथकाची टीम शहरातील विविध भागातील सीसीटीव्ही फुटेज तसेच संशयित इसमाच्या मोटरसायकलच्या अर्धवट दिसणार्या नंबर प्लेटवरुन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातून माहिती प्राप्त करून त्याचा शोध घेत होते.
हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने तसेच संबंधिताकडून महिला व मुलींच्या छेडछाडीचे आणखी गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यास तातडीने ताब्यात घेणे आवश्यक होते. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज आधारे प्राप्त करण्यात आलेले आरोपीचे फोटो सोशल मीडियावर सुद्धा प्रसारित करण्यात आले होते.
सातारा शहर डी बी पथकाकडून सुमारे 60 सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी करत व त्याप्रमाणे माग काढत जात असताना सदर संशयित इसम हा सैदापूर या गावापर्यंत पोहोचल्याचे दिसून आल्याने डीबी पथकाने गावातून अधिक माहिती घेतली असता त्याचे नाव विनोद मोहन कामटे. वय 40 वर्ष, रा. सैदापूर जि. सातारा मूळ गाव जातेगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास तातडीने ताब्यात घेण्यात आले.
याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यात कामटे याच्या विरोधात पोक्सोंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच त्याला अटकही करण्यात आली आहे.
या कारवाईत या कारवाईत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो.हवा. निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, प्रविण कडव पो.ना. पंकज मोहिते, पो.कॉ. तुषार भोसले, सागर गायकवाड, मच्छिंद्रनाथ माने, सुहास कदम, सुशांत कदम, वैभव माने, संतोष घाडगे, सचिन रिटे यांनी सहभाग घेतला.