सातारा : शिवसेना उबाठा ठाकरे गटाच्या वतीने विधानसभेत रमी खेळणार्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी जेलभरो आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी कोकाटे यांच्या निषेधाच्या घोषणा देत शिवतीर्थ पोवई नाका येथे रस्त्यावर बसकन मारली. त्यामुळे काही काळ येथे वाहतुकीची कोंडी झाली होती.
या आंदोलनामध्ये शेतकरी सेना जिल्हाप्रमुख प्रताप जाधव, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय नलावडे, सातारा तालुकाप्रमुख रमेश बोराटे, कोरेगाव तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे, क्षेत्र प्रमुख भानुदास कोरडे, सातारा तालुका संघटक प्रणव सावंत, गणेश अहिवळे, ईश्वर वाघमोडे, सागर धोत्रे, युवा सेना जिल्हाप्रमुख शिवाजी चौधरी, सुनील पवार, मुगुटराव कदम, मनोज नलावडे, यशवंत जाधव, आशुतोष पारंगे, सुमित नाईक, शशिकांत घाडगे, बबन फाळके, सुनील साळुंखे इत्यादी शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
शिवसैनिकांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमा सातार्यात झळकवून त्यांच्या रमी प्रकरणाचा निषेध केला. कृषीमंत्र्याचं करायचं काय खाली मुंडी वर पाय, अशा निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. या आंदोलनासंदर्भात बोलताना प्रताप जाधव म्हणाले, जिल्हा प्रशासन आमच्या आंदोलनाकडे लक्ष देत नाही. मात्र शेतकर्यांचे राज्यात प्रलंबित प्रश्न असताना कृषी मंत्री विधानसभेत रमी खेळतात हे अत्यंत निंदनीय आहे. जोपर्यंत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेत नाहीत, तोपर्यंत शिवसेनेचे निषेध आंदोलन याच पद्धतीनेच तीव्रतेने सुरू राहणार आहे. शिवतीर्थ येथे शिवसैनिकांनी रस्ता अडवून आंदोलन तीव्र करण्याचा प्रयत्न केला. मात्र सातारा शहर पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना ताब्यात घेतले आणि रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत केला. तरीही शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवली होती.