उपमुख्यमंत्री अजित पवारांची साताऱ्यात अचानक 'एन्ट्री '

प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ ; नवीन विश्रामगृहाच्या दुरावस्थेबद्दल केली नाराजी व्यक्त

by Team Satara Today | published on : 03 October 2025


सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळी अचानक सातारा जिल्हा दौऱ्यावर आल्यामुळे, प्रशासकीय अधिकाऱ्यांसह, कार्यकर्त्याची चांगलीच धावपळ उडाली. येथील नवीन शासकीय विश्रामगृहात काही वेळ थांबल्यानंतर तत्काळ ते कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखाना येथे नियोजित कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले. 

आज दि. ०३ रोजी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक सातारा जिल्हा दौऱ्यावर आले होते. नियोजित दौरा नसल्याने, जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसह, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रमुखांची धावपळ यावेळी पाहायला मिळाली. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचे सुरक्षा रक्षक सोडल्यास, कुठल्याही शासकीय लव्याजमाविना सातारा शहरातील नवीन विश्रामगृहावर दाखल झाले. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री, खासदार आमदार व कार्यकर्तेही या दौऱ्याबाबत अनभिज्ञ होते. 

अजित पवार साताऱ्यातील विश्रामगृहावर दाखल झाल्यानंतर, जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील तसेच जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर काही वेळ ते विश्रामगृहाच्या बाहेर उभे होते. यावेळी त्यांचे लक्ष विश्रामगृहाच्या पोर्चमधील तुटलेल्या फरश्यांकडे गेल्यानंतर त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत नाराजी व्यक्त केली. कोट्यवधी रुपये बांधकामासाठी खर्च करूनही, असे निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याबाबत त्यांना चांगलेच फैलावर घेतले. तसेच फुटलेल्या फरशा तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या. 

दरम्यान, अजित पवारांच्या या अचानक दौऱ्यामुळे जिल्हा प्रशासनासह त्याच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र आज सातारा शहरात पाहायला मिळाले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यात विजयादशमीचा पारंपारिक सोहळा उत्साहात

संबंधित बातम्या