शाहूपुरी माध्यमिक विद्यालयात आनंददायी कौशल्य महोत्सव ! विविध वस्तू बनवून विद्यार्थ्यांनी मुक्तकलेचा मनमुराद आनंद लुटला

by Team Satara Today | published on : 16 March 2026


सातारा : येथील शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाच्या संस्कार वर्गामध्ये जणू कला कौशल्याच्या निमित्ताने कौशल्य महोत्सव आकारास आला.वर्गाचे सुरुवातीस प्राणायाम, नामस्मरण,निसर्ग व आईवडीलांची मानसपूजा या प्रारंभीच्या संस्कार विधीनंतर मागील आठवडय़ात घडून गेलेल्या ठळक घडामोडींवर (महिला दिन, सावित्रीबाई फुले पुण्यतिथी) उपस्थित बालमित्रांशी संवाद साधल्यानंतर कला ही मानवी जीवनाचा कसा अविभाज्य भाग आहे,कला ही आपले जगणे कसे सुंदर करते याविषयी उपस्थितांशी चर्चा करण्यात आली.

पुस्तकी ज्ञानाबरोबरच आपल्या प्रत्येकाच्या अंगी असे एखादे कलाकौशल्य असते की आपण जर त्याची जाणीवपूर्वक जोपासना केली तर हीच कला आपले तसेच समाजाचे जगणे सुंदर करुन आपणांस अमर करुन जाते.उदाहरणच द्यायचे झाले तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर,पंडीत भीमसेन जोशी,सुधीर फडके,अरुण दाते,पु.ल.देशपांडे,कवी कुसुमाग्रज,आचार्य बाळशास्री जांभेकर, द.मा.मिरासदार,शंकर पाटील,ग.दि.माडगूळकर,नृत्य प्रशिक्षक कृष्णदेव मुळगुंद,हाॅकीपटू मेजर ध्यानचंद,कुस्तीपटू खाशाबा जाधव,चित्रपट सृष्टीतील दादासाहेब फाळके,गीतकार जगदीश खेबूडकर अशी असंख्य नावे आपणांस घेता येतील की ज्यांनी आपल्यातील मूलभूत कौशल्याच्या बळावर भारतीय इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.यातील सर्वच व्यक्ती सुरुवातीपासूनच प्रसिध्दीच्या झोतात होत्या असे नाही.त्या अगदी सर्वसामान्य कुटुंबातील होत्या.परंतु,अखंड साधनेच्या जोरावर त्यांनी स्वत:ला सिद्ध केले.यातूनच बोध घेऊन आपणही आपल्यातील क्षमता ओळखून स्वत:ला सिद्ध करावे.कारण,आपल्या अंगी असलेली कलाकौशल्ये आपणांस मानवी जगण्याचा अर्थ समजावून सांगतात.

मित्रांनो,शिक्षित होणे म्हणजे नुसते पुस्तकी ज्ञान घेणे,परीक्षा देणे,उच्च पदवी संपादन करणे एवढ्याच पुरता  शिक्षणाचा अर्थ सिमित नसून आयुष्यात यापेक्षाही वेगळे जग असू शकते याची जाणीव आपणांस हवी.याचकरीता सर्वप्रथम स्वत:ला ओळखा...आणि घडवा.जीवनाचे क्षितिज खूप विस्तीर्ण आहे.प्रत्येक क्षेत्रातील प्रगतीसाठी खूप वाव आहे.गरज आहे ती फक्त जिद्द,चिकाटी व अखंड परिश्रमाची.

अंत:करणाचे डोळे उघडे ठेवून जीवनाकडे पहाल तर चोहोकडे आनंद आहे.आपली दृष्टी व्यापक बनवूया आणि सृष्टीतील संकल्पनांचा हा आनंद लुटता-लुटता हा समाज सुंदर करुयांत असे आवाहन करुन पूर्वनियोजनानुसार सर्व मुलांनी एक तासभराच्या कालावधीत बघता-बघता आपल्यातील कलागुणांना ओळखून मातीच्या,कागदाच्या वस्तू,उत्तम चित्राकृती, क्लेपासून निर्मित वस्तू बनवून मुक्तकलेचा मनमुराद आनंद लुटत त्यांच्या-आमच्या आयुष्यातील हे क्षण सोनेरी केले.

यानिमित्ताने भावी आयुष्यात हीच मुले कलेच्या माध्यमातून आपल्या जीवनास आकार देण्यात यशस्वी होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी अध्यक्ष भारत भोसले तसेच सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

संस्कार वर्गाचे हे 17 व वर्ष आहे. या संस्कार वर्ग बद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
करंजेपेठ येथील श्रीपतराव पाटील हायस्कूलच्या वतीने म्हसवे येथे ग्रामस्वच्छता अभियान

संबंधित बातम्या