कोयना धरणात ८८ टीएमसी पाणीसाठा; पाण्याचे काटेकोरपणे नियोजन गरजेचे, आत्तापर्यंत सिंचनासाठी तब्बल ७.११ टीएमसी पाणीवापर

by Team Satara Today | published on : 01 November 2026


पाटण : या जलवर्षातील पाच महिन्यात कोयना धरणात १३३.२३ टीएमसी पाण्याची आवक झाली. यापैकी आतापर्यंत वापर व विनावापर पाणी वगळता आगामी सात महिन्यांसाठी धरणात उपलब्ध ८८.३३ पैकी उपयुक्त ८३.२१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. आत्तापर्यंत सिंचनासाठी तब्बल ७.११ टीएमसी पाणीवापर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत जादा वीजनिर्मिती झाली असली तरी आगामी काळात कोयनेतील पाण्यावर अवलंबून सिंचनासह जलविद्युत निर्मितीसाठी प्रशासकीय काटेकोर नियोजन व सर्वसामान्यांसह शेतकर्‍यांनी किमान पाण्याचा वापर हे धोरण अत्यंत कठोरपणे राबवावे लागण्याची तांत्रिक परिस्थिती सध्या कोयना धरणात पहायला मिळत आहे.
गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ४७.५४ टीएमसी पाण्याची कमी आवक झाली आहे. एक जूनपासून सुरू झालेल्या या जलवर्षात पावसाळ्यातील प्रमुख चार महिन्यात धरणात १३३.५७ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. १ जून २०२६ पासून सुरू झालेल्या नव्या वर्षारंभाला धरणात १५.८८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. तर यावर्षी अल निनोचा प्रभाव व हवामान खात्याने सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे धरणातील पाणीसाठा व पाऊस याबाबत सार्वत्रिक चिंता व्यक्त होत होती.
याच पार्श्वभूमीवर सुरुवातीला पश्चिमेकडील जलविद्युत निर्मिती पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर सिंचनामध्ये शेती व औद्योगिक वापरासाठी लागणारे पाणीही पूर्णपणे बंद करून केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच पाणी सोडले जात होते. या जलवर्षात आत्तापर्यंत धरणात १३३.२३ टीएमसी पाण्याची आवक झाली असून आत्तापर्यंत त्यापैकी पश्चिम वीजनिर्मितीसाठी २४.७१ टीएमसी तर पूर्वेकडे सिंचनासाठी पायथा वीज गृहातून वीजनिर्मिती करून ४.६७ तर धरण दरवाजातून विनावापर १.६२ असा एकूण ६.२९ टीएमसी पाणीवापर झाला आहे. याशिवाय पूरकाळात २.४४ टीएमसी पाणी पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून सोडण्यात आले. तर विनावापर २५.६९ टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे वापर व विनावापर असे आत्तापर्यंत ५९.१३ टीएमसी पाणी जाऊन सध्या धरणात उपलब्ध ८८.३३ पैकी उपयुक्त ८३.२१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
धरणाच्या जलवर्षेपूर्तीला अद्याप सात महिन्यांचा कालावधी आहे, पश्चिमेकडे वर्षभरात जलविद्युत निर्मितीसाठी ६७.५० टीएमसी पाणी कोटा आरक्षित असतो. त्यापैकी आतापर्यंतच्या पाच महिन्यात २४.७१ टीएमसी पाणी वापरण्यात आले आहे. उर्वरित सात महिन्यांसाठी आरक्षीत ४२.७९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. या पुढच्या सात महिन्यात पश्चिम जलविद्युत निर्मितीसाठी ४२.७९, मृतसाठा ५ टीएमसी मृतसाठा वगळता त्यानंतर सरासरी ४० टीएमसी पाणी सिंचनासाठी शिल्लक राहू शकते. आगामी जल वर्षातील पहिल्या जून, जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस पडेपर्यंत या पाण्याचा काटेकोर वापरही तितकाच गरजेचा आहे. एका बाजूला धरण व्यवस्थापन असो अथवा ऊर्जा निर्मिती या दोन्ही ठिकाणी पाण्याचे काटेकोरपणे नियोजन गरजेचे आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कण्हेर परिसरातील क्रिकेट मैदानावर थरार; प्रेमसंबंधाच्या वादातून गोळीबार, तरुण गंभीर जखमी
पुढील बातमी
नीरा-लोणंद मार्गावरील बाळूपाटलाचीवाडी येथे अपघातात पती ठार, पत्‍नी गंभीर जखमी

संबंधित बातम्या