सातारा : जमिनीच्या खरेदीसाठी २५ लाखाची रक्कम आरटीजीएसद्वारे आणि रोखीने घेऊन जमीन खरेदीचा व्यवहार न करता फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये एका मुख्यालयातील पोलिसाचा समावेश असून पोलीस कॉन्स्टेबल सागर दिलीप भुजबळ यांच्यासह दिलीप आनंत भुजबळ आणि मयूर दिलीप भुजबळ अशी गुन्हा दाखल झालेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दि. १५ एप्रिल २०२५ ते १७ ऑगस्ट २०२५ दरम्यान जमिनीच्या व्यवहाराची घटना घडली आहे. यामध्ये तिन्ही आरोपींनी संगणमत करून फिर्यादी धैर्यशील मारुती देशमुख (वय ४७ वर्ष, राहणार आयटीआय, सध्या विकास नगर खेड,सातारा) यांना अंगापूर येथील त्याचे वडिलार्जित गट नं.१, गट नं.१०६, गट नं १३६३ या जमिनीची खरेदीचे व्यवहारासाठी फिर्यादी कडून एकूण २५ लाख रुपये आरटीजीएसद्वारे व रोखीने घेतले त्यानंतर या जमिन खरेदीचा व्यवहार न करता फिर्यादीची फसवणूक केली.
फिर्यादीने पैशाची मागणी केली असता तिघांनी टाळाटाळ आणि उडवाउडवीची उत्तरे दिल्याने आपली फसवणूक झाली आहे याची खात्री पटल्यानंतर धैर्यशील देशमुख यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दि. ११ रोजी सायंकाळी आठ वाजता सुमारास फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसासह पिता- पुत्रांवर भारतीय न्यायसाहिता कलम ३१८ (४)३(५) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे करत आहे.