कराड : मैदानात शड्डू ठोकून प्रतिस्पर्ध्याला चितपट करणारा आणि महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा मायणीचा युवा पैलवान राहुल कोरडे याचे वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी दुःखद निधन झाले. निमसोड येथील आखाड्यात कुस्ती जिंकल्यानंतर दुसऱ्या कुस्तीसाठी जात असताना वाटेतच चक्कर आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. राहुलच्या अकाली निधनाने कुस्ती क्षेत्रासह सातारा आणि सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
राहुल कोरडे याची कुस्तीतील कारकीर्द अत्यंत संघर्षातून उभी राहिली होती. घरची ओढग्रस्त परिस्थिती असतानाही वडिलांची मोलमजुरी आणि आईचे कष्ट यांच्या जोरावर त्याने लाल मातीत आपले पाय घट्ट रोवले. इंदिरानगरमधील समर्थ व्यायाम शाळेतून कुस्तीचा श्रीगणेशा केल्यानंतर त्याने सांगलीच्या भोसले व्यायाम मंदिरात सराव सुरू केला. थोरल्या भावानेही स्वतः कष्ट करून राहुलच्या स्वप्नांना बळ दिले. राहुलने आपल्या जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते, तर सलग दोन वर्षे त्याने तृतीय क्रमांक राखला होता. याशिवाय शिवाजी विद्यापीठ चॅम्पियनशिप, त्रिमूर्ती केसरी आणि माण-खटाव केसरी यांसारख्या अनेक प्रतिष्ठित गदा आणि पदकांवर त्याने आपले नाव कोरले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, निमसोड यात्रेतील कुस्ती जिंकून राहुल तडवळे येथील आखाड्याकडे रवाना झाला होता. मात्र, प्रवासातच त्याला चक्कर आली. प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने मायणी व त्यानंतर कराड येथील रुग्णालयात हलवण्यात आले. आपल्या लाडक्या मित्राचे प्राण वाचवण्यासाठी मायणीतील युवकांनी माणुसकीचे दर्शन घडवत केवळ एका तासात दोन लाख ८० हजार रुपयांचा निधी संकलित केला होता. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. उपचारादरम्यान राहुलची झुंज अपयशी ठरली. काल मायणी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कुस्ती शौकीनांसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. एका उगवत्या ताऱ्याच्या निधनाने कुस्ती क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची भावना व्यक्त होत आहे.