सातारा : राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये लवकरच आठ मंत्र्यांच्या पदांवर गंडांतर येणार आहे, असे भाकीत खासदार संजय राऊत यांनी वर्तवले होते. या वक्तव्याचा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातार्यात खोचक समाचार घेतला. ते म्हणाले, संजय राऊत यांच्या भाकिताला काय म्हणावे? तुम्ही त्यांनाच विचारा नक्की काय ते, त्यांच्याबाबत मी काय सांगणार ? कदाचित भारतीय जनता पक्षाची यादी त्यांच्याकडून फायनल होऊन पुढे जात असेल, असा खोचक टोला जयकुमार गोरे यांनी लगावला.
भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांना पक्षश्रेष्ठींचे चांगल्या कामासाठी नेहमीच बळ असते. भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे ज्यांनी भाकिते केली त्यांचेच अंदाज तुम्ही नंतर पाहून घ्या, असेही त्यांनी सुनावले.
धर्मादाय रुग्णालयांच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीमध्ये सहभागी होण्याकरिता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सातार्यात आले होते. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मनमोकळा संवाद साधला.
ते पुढे म्हणाले, संजय राऊतांचे आरोप नेहमीच सत्ताधार्यांवर होत असतात. कोणत्या मंत्र्यांच्या पदांवर काय गंडांतर येणार आहे हे त्यांनी केलेले भाकित आहे. त्यामुळे त्यांच्या भाकिताचा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा, असा प्रतिप्रश्न गोरे यांनी केला. याबाबतची सखोल माहिती त्यांनाच असावी कदाचित, असेही ते म्हणाले. ते भाजपची कदाचित यादी फायनल करत असतील, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. जिल्हा परिषद शिक्षक बदली प्रक्रिये संदर्भात जयकुमार गोरे यांनी सांगितले, याबाबत तपासणी सुरू आहे. यामध्ये सातार्याच्या सीईओ याशनी नागराजन यांचे मी कौतुक करतो. हा राज्यव्यापी विषय आहे. संपूर्ण राज्यांमध्ये संवर्ग एक च्या संदर्भाने गैरमार्गाने काही लोकांनी प्रयत्न केलेले आहेत. ज्यांनी असे प्रयत्न केलेले आहेत ते सर्व दोषी आहेत. त्यामुळे त्यांची योग्य ती माहिती घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भातील सूचना संपूर्ण राज्यातील झेडपी सीईओ यांना देण्यात आलेल्या आहेत. सातार्यात जर या संदर्भाने काही गोष्टी झाल्या असतील तर त्याचाही तपास होईल. पण आत्ताच या विषयावर बोलणे योग्य ठरणार नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भाने राज्यात महायुती एकत्र लढणार की नाही, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, स्थानिक परिस्थिती काय आहे त्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. पक्ष पातळीवर निर्णय झाला तर त्याची अंमलबजावणी करणे आमची जबाबदारी आहे. पण असं जरी असलं तरी काही मतदारसंघ, तालुके अशा काही ठिकाणी आम्ही एकत्र लढू शकत नाही. त्यामुळे त्या संदर्भात निर्णय घेण्याकरिता वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल त्यानुसारच आम्ही त्या सूचना पाळू.
जलजीवन मिशनचे ठेकेदार हर्षद पाटील यांच्या आत्महत्या संदर्भात ते म्हणाले, वर्क ऑर्डर त्यांच्या नावाने आहे का? यामध्ये ते मुख्य ठेकेदार होते का? हे प्रश्न तपासून पुढील गोष्टींची माहिती घेऊ. यातील सर्व बाबी तपासाव्या लागतील. माझ्या खात्या संदर्भात बोलायचे झाले तर ग्रामविकास विभागात तशी परिस्थिती नाही. ज्या ठेकेदारांनी आपली बिले वेळेवर दिली आहेत त्यांना बिले दिली जात आहेत, असा दावा त्यांनी केला. महामंडळाच्या निवडी संदर्भातही त्यांनी जादा बोलणे टाळले. यासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील यात मी बोलू शकत नाही. राज्याला घरकुलांचे सहा महिन्यात तीस लाख उद्दिष्ट मिळाले होते. संपूर्ण देशात आतापर्यंत कोणत्याच राज्याला एवढ्या प्रमाणात घरकुले मिळाली नव्हती. त्या सर्व घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आमचे नियोजन असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले.
माजी आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी मला बोलण्याचा अधिकार आहे; पण आज माझ्या तोंडाला सेन्सरशिप लावली आहे. योग्य वेळ आल्यावर मी नक्की बोलेल, असे वक्तव्य केले होते. या प्रश्नावर बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, महाराज साहेबांना मी सर्वाधिकार बहाल केले आहेत व त्यांच्या वयाच्या हिशोबाने आणि त्यांना या वयात त्रास न होणे अशी व्यवस्था आपण करूया. जनता दरबार हा राजांचा भरतो, सेवकांचा नाही. मी जनतेचा सेवक आहे, असाही टोला त्यांनी एका प्रश्नाला लगावला.