सातारा : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील सर्व १३७ मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक आणि स्थिर व्हिडीओग्राफीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार असून, मतदान प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे उपस्थित होते.
जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघासाठी ४४, तर पदवीधर मतदारसंघासाठी ९३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. शिक्षक मतदारसंघात एकूण ९ हजार ४५४ मतदार असून, त्यामध्ये ५ हजार ४२१ पुरुष, ४ हजार ३३ महिला आणि दोन इतर मतदारांचा समावेश आहे. पदवीधर मतदारसंघात ४७ हजार ४६३ मतदार आहेत. त्यामध्ये २९ हजार ४८९ पुरुष, १७ हजार ९७२ महिला आणि सहा इतर मतदार आहेत.
मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी शिक्षक मतदारसंघासाठी २२०, तर पदवीधर मतदारसंघासाठी ४६५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय अनुक्रमे ६० आणि १०० राखीव कर्मचारी उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. शिक्षक मतदारसंघासाठी १०८, तर पदवीधर मतदारसंघासाठी ३८५ मतपेट्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेची कार्यपद्धती, मतदारांची ओळख पडताळणी, मतदार नोंदवही आणि मतपेट्यांचा वापर याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक मूलभूत सुविधा, मतदार याद्या आणि मतदान साहित्य उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी नियुक्त अधिकारी संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहेत.
मतदारांना नाव तपासण्याचे आवाहन
शिक्षक व पदवीधर मतदारांनी मतदानापूर्वी मतदार यादीतील आपले नाव आणि मतदान केंद्राची माहिती तपासून घ्यावी. त्यासाठी https://mahaelection.gov.in/Citizen/Search या संकेतस्थळावरील मतदार नाव शोध सुविधेचा वापर करावा. सर्व पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज; १३७ मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक, स्थिर व्हिडीओग्राफीद्वारे नजर; २३ ऑक्टोबरला मतदान
by Team Satara Today | published on : 21 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा