सातारा : खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे प्रतिबंधित तंबाखूजन्य व अन्नपदार्थांचा साठा करून विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. औंध पोलिसांच्या मदतीने पंकज ट्रेडिंग कंपनीवर करण्यात आलेल्या कारवाईत २७ हजार ६०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
दुकानमालक पंकज सुभाष खोत (वय २९, रा. मेरवेवाडी, ता. कराड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रूपनवर यांनी याबाबत फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २१ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ वाजता पंकज ट्रेडिंग कंपनीची तपासणी केली असता दुकानात विमल पान मसाला, तंबाखू, राजू इलायची सुपारी आणि सुका मावा असा प्रतिबंधित माल विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळले. त्यानंतर प्रशासनाने संबंधित साठा जप्त केला. अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या १३ जुलै २०२६ रोजीच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे.
औंध पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. डी. जानकर तपास करीत आहेत.