सातारा शहरात पाणीपुरवठ्याचा पेच सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाची धावपळ; पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात

by Team Satara Today | published on : 28 November 2026


सातारा : शहरातील काही भागांत गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या पाईपलाईनच्या कामाला अखेर गती देण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली. तसेच संबंधित यंत्रणेने कामात दिरंगाई न करता ते तातडीने पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या.
जिल्हा परिषदेसमोरील नवीन नगरपालिका ते कलेक्टर बंगला या मार्गावर नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून हे काम रखडल्याने पिरवाडी, देवी कॉलनी, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि डी. जी. कॉलेज परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे.
नगराध्यक्ष मोहिते यांनी कामाची सद्यस्थिती जाणून घेत जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जालना येथून पाईप मागविण्यात आले होते. मात्र, त्यांचा पुरवठा विलंबाने झाल्यामुळे कामाचा वेग मंदावल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. न्यायालयासमोरील पाईपलाईनचे काम पूर्णत्वाकडे असून सोमवार ते मंगळवारपर्यंत संबंधित भागातील पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पाईपलाईनचे काम सुरू असताना नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी पालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली. गेल्या आठ दिवसांत टँकरच्या सुमारे ४०० ते ५०० खेपा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या माध्यमातून प्रभावित भागातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पाहणीवेळी नगरसेविका वैशाली राजेभोसले, नगरसेवक विश्वतेज बालगुडे, जीवन प्राधिकरणाचे अधिकारी कुलकर्णी आणि अभियंता दीपक राठोड उपस्थित होते.
पाईपलाईनच्या कामातील विलंबामुळे नागरिकांना सहन कराव्या लागलेल्या त्रासाची दखल घेत आता उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी दिलेली मुदत पाळली जाते का, याकडे संबंधित परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मर्ढे परिसरात अवैध देशी दारूची वाहतूक उघड; 34 लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त, सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई
पुढील बातमी
महाबळेश्वरच्या रस्त्यांसाठी सरकारचा पर्यायी मार्गाचा विचार; पर्यायी घाटरस्ता उभारण्याच्या हालचाली सुरू, विकासकामांतील विलंबाचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी मांडले कारण

संबंधित बातम्या