प्रहार संघटनेच्या वतीने बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये रास्ता रोको

पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड; वाहतुकीची कोंडी

by Team Satara Today | published on : 24 July 2025


सातारा : दिव्यांग बांधवांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. या निषेधार्थ प्रहार संघटनेच्या वतीने गुरुवारी सातार्‍यात येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये रास्ता रोको करण्यात आला. दिव्यांग बांधवांनी रस्त्यावर आडव्या तीन चाकी गाड्या लावून तेथेच रस्त्यावर बैठक लावली. सुमारे अर्धा तास दिव्यांग बांधवांचे हे आंदोलन सुरू होते. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन येथील वाहतूक सुरळीत केली. त्यामुळे बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते विसावा नाका मार्गावर वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या.प्रहार संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांच्या मागण्यांसाठी आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. दिव्यांग बांधवांना सरकारी नोकरीत आरक्षण, घरकुलांसाठी विशेष अनुदान, सरकारी कार्यालयामध्ये प्रवेश करण्यासाठी विशेष रॅम्प ची सोय, शिक्षणासाठी विशेष सवलत, दिव्यांगांच्या विकासासाठी आमदार फंडातून केल्या जाणार्‍या खर्चाकडे दुर्लक्ष यासंदर्भात प्रहार संघटनेच्या वतीने आझाद मैदानासह आंदोलन करत राज्यशासनाला जाब विचारला होता. यासंदर्भात तात्काळ मीटिंग लावण्याचे निर्देशित करण्यात आले होते. मात्र तरीही राज्य शासन या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आदेशाप्रमाणे राज्यव्यापी आंदोलनाचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार प्रहार क्रांती संघटनेचे सक्रिय सदस्य व दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष अजय पवार, आनंदा पोतेकर, शैलेंद्र बोडरे, पांडुरंग शेलार, अमोल भातुसे, अविनाश कुलकर्णी, आबाजी लोहार, चंद्रकांत निंबाळकर, नामदेव इंगळे, अमोल करडे, समीना शेख, महेश जगताप, प्रफुल्ल मस्के, प्रशांत बजले यांनी आंदोलनात भाग घेतला होता. सातारा शहरात दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. अशा पावसातही दिव्यांग बांधवांनी बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये रस्त्यावर बसकन मारत राज्य शासनाचा निषेध केला. त्यामुळे विसावा नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही येथून हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. मात्र सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के फौज फाट्यासह दाखल झाले आणि दिव्यांग बांधवांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. यानंतर वाहतुकीसाठी रस्ता पूर्ववत करण्यात आला. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी उबाठा गटाचे जेलभरो आंदोलन
पुढील बातमी
माफीची साक्षीदार असलेल्या ज्योती मांढरेला जामीन

संबंधित बातम्या