पोक्सो प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा; एकाला अटक, दोघांचा शोध सुरू

by Team Satara Today | published on : 03 October 2026


सातारा : मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध केल्याचा तसेच वेगवेगळ्या ठिकाणी तिच्याशी गैरवर्तन करून धमकी दिल्याचा आरोप असलेल्या तिघांविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
ही घटना 9 ऑगस्ट 2025 ते ऑगस्ट 2026 या कालावधीत सातारा तालुक्यातील एका गावात घडली आहे. याबाबत पीडितेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, प्रतीक इंदलकरला पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही, घरात कोणी नसताना 9 ऑगस्ट 2025 रोजी तसेच त्यानंतर वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले आहे.
तसेच दिवाळीच्या सुट्टीत कुटुंबासह मांढरदेवी येथे दर्शनासाठी जात असताना एका नातेवाईकांकडे थांबले होते. त्यावेळी वाहनात कोणी नसताना  समीर उमराणीकर याने तिच्याशी गैरवर्तन केले आणि हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याशिवाय ऑगस्ट 2026 मध्ये साईश पवार याने रूम दाखविण्याच्या बहाण्याने पीडितेला सोबत नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रतीक इंदलकर याला ताब्यात घेऊन अटक केली असून, समीर उमराणीकर आणि साईश पवार यांचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मोबाईलची तक्रार करण्यास गेलेल्या ग्राहकाला मारहाण

संबंधित बातम्या