सात दिवसांच्या बाप्पांना गौराईसह भावपूर्ण निरोप

विसर्जन तळ्यावर मुख्य समारोप सोहळ्याची रंगीत तालीम

by Team Satara Today | published on : 02 September 2025


सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात घराघरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणेशाला मंगळवारी सातव्या दिवशी वाजत गाजत निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनासाठी दुपारनंतर भक्तांनी गर्दी केली होती. गणेशाची स्थापना झाल्यानंतर दीड दिवस, पाच दिवस तसेच सातव्या दिवशी गणेशाचे विसर्जन केले जाते. गोडधोड स्वागतानंतर गौराईसह गणरायाला विधीवत पूजेनंतर आबालवृद्धांनी निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

सातारा शहरात बुधवार नाका येथील मुख्य विसर्जन तळ्यासह शहरात पाच ठिकाणी कृत्रिम तळी सज्ज करण्यात आली होती. त्या ठिकाणी सर्व गणरायांचे विधिवत विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला, एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, असा जयघोष करत गणेश भक्तांनी गणरायाला निरोप देत सातारा शहरातून त्यांची छोटेखानी मिरवणूक काढली. सातारा शहरांमध्ये सुमारे साडेसात हजार घरगुती, तर सातारा शहरातील 13 गणेशोत्सव मंडळांच्या निरोप देण्यात आला. विसर्जन तळ्यांवर क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. पाच विसर्जन तळ्यावर 25 सीसीटीव्ही आणि 11 जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. सातारा शहरात काही ठिकाणी शाडू मातीच्या गणरायांचे बादलीत विसर्जन करण्यात आले. तसेच सातारा शहरातील विविध सोसायटीमध्ये बसवलेल्या गणरायाला निरोप देण्यात आला. ढोल पथकाच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. 

सातारा पालिकेने शहरामध्ये दहा ठिकाणी विसर्जन कुंडाची सोय केली होती. गणेश विसर्जनाच्या वेळी भाविकांना सहकार्य करण्यासाठी सातारा पालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. काही स्वयंसेवक गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी सूचना करत होते. सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. सुमारे साडेतीनशे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते. निर्माल्य पाण्यात टाकले जाऊ नये यासाठी नगरपालिका कर्मचार्‍यांच्या वतीने निर्माल्य संकलित करण्यात येत होते. गौराईच्या तीन दिवसांचा स्वागत सोहळा मंगळवारी उशिरापर्यंत रंगला. गौराईसह सात दिवसाच्या बाप्पांना निरोप देताना सातारकरांनी पुढच्या वर्षी लवकर या, अशा जोरदार घोषणा दिल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मराठा आरक्षण प्रश्नावर राज्य शासनाने लवकर तोडगा काढावा
पुढील बातमी
शिवतीर्थावर मराठा बांधवांचा जल्लोष

संबंधित बातम्या