देहुतील ॲम्युनेशन्स फॅक्टरीला मोठा बंदोबस्त

पोलीस यंत्रणा अलर्ट

by Team Satara Today | published on : 10 May 2025


पिंपरी : 22 एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने बदला घेतला. बुधवारी 7 मे ला भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानात एअर स्ट्राईक केला. भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची नऊ तळ उद्ध्वस्त केली. यात 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं सांगितलं जात आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने देखील सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असून अंदाधुंद फायरींग करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तान कडून भारतावर हल्ले सुरु आहेत. मात्र भारताच्या लष्कराने योग्य प्रत्त्युत्तर दिलेले आहे.

सीमाभागात पाकिस्तानकडून सातत्याने ड्रोन हल्ले सुरू आहेत. अशात सीमेवरील भारत पाकिस्तान संघर्षाचा परिणाम आता थेट पुण्यावर होताना दिसत आहे. यातच देशाच्या संरक्षण खात्याला दारु गोळा साठा असणारे ॲम्युनेशन्स फॅक्टरी देहूरोड येथे आहे. हा भाग अत्यंत संवेदनशील असल्याने आताच्या परिस्थितीत या ठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात यापुर्वी काही बॉम्ब स्फोटातील आरोपी वास्तव करून गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे. अनेक संशयित ठिकाणी काँबिग ऑपरेशन घेऊन तपासणी सुरू आहे. महत्वाच्या ठिकाणी योग्य तपासणी केल्या जात असून त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावलेला आहे.

वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मिटींग घेण्यात आलेल्या असून योग्य त्या सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. देशाच्या सैनिकांसोबत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

पिंपरी येथे रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी (दि. ९) दुपारी दोन जुने बॉम्ब शेल आढळून आले. भारत-पाकिस्तान युद्धाचा तणाव वाढत असताना हे बॉम्ब शेल आढळल्याने शुक्रवारी शहरात एकच खळबळ उडाली. पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या भंगारच्या दुकानाजवळ शुक्रवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास हे जुने बॉम्ब शेल आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस, बॉम्ब शोधक, नाशक पथक आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ धाव घेतली. बॉम्ब शोधक नाशक पथकाने बॉम्ब शेलची पाहणी करून ते ताब्यात घेतले आहेत.  पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. मात्र आणखी बॉम्ब शेल अथवा इतर संशयित वस्तू आढळून आल्या नाहीत. आढळलेले बॉम्ब शेल पुढील तपासणीसाठी संरक्षण विभागाकडे दिले जाणार आहेत. हे बॉम्ब शेल भांगरमध्ये चोरट्या पद्धतीने आणले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाराष्ट्रात तिसऱ्या भाषेचा पर्याय
पुढील बातमी
'ऑपरेशन सिंदूर'वर आधारित चित्रपटाची घोषणा

संबंधित बातम्या