भाडळेतील बालविवाहाचा प्रयत्न पोलिसांनी उधळला; अल्पवयीन मुलीला संरक्षण

लग्नमंडप सजण्यापूर्वीच वाठार पोलिसांची धडक; १७ वर्षांच्या मुलीची बालकल्याण समितीकडून काळजी

by Team Satara Today | published on : 26 November 2026


सातारा : कायद्याने ठरवून दिलेली वयोमर्यादा पूर्ण होण्यापूर्वीच मुलीच्या विवाहाची तयारी करण्यात आल्याचा प्रकार कोरेगाव तालुक्यातील भाडळे येथे उघडकीस आला. मात्र, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीमुळे हा विवाह होण्यापूर्वीच रोखण्यात यश आले. वाठार पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत १७ वर्षे ८ महिने वयाच्या मुलीची सुटका केली. पुढील संरक्षणासाठी तिला सातारा जिल्हा बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले.
बालविवाह रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेदरम्यान गुरुवारी (दि. २६) वाठार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांना भाडळे येथे अल्पवयीन मुलीचा विवाह आयोजित करण्यात आल्याची माहिती मिळाली. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने पोलीस पथक रवाना केले.
पोलिसांनी विवाहस्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली असता लग्नाची तयारी पूर्णत्वाच्या दिशेने सुरू होती. यावेळी २५ ते ३० नातेवाईकही उपस्थित होते. पोलिसांनी संबंधित मुलीच्या वयाची अधिकृत कागदपत्रांद्वारे पडताळणी केली. त्यामध्ये तिचे वय १७ वर्षे ८ महिने असल्याचे स्पष्ट झाले. मुलीने विवाहासाठी आवश्यक असलेली १८ वर्षांची वयोमर्यादा पूर्ण केली नसल्याने पोलिसांनी तत्काळ विवाह थांबविण्याची कारवाई केली.
यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मुलीशी संवाद साधून तिला विश्वासात घेतले. तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन तिला बालकल्याण समितीसमोर उपस्थित करण्यात आले. समितीने परिस्थितीचा आढावा घेत मुलीला काळजी व संरक्षणाची आवश्यकता असल्याचे निश्चित केले. त्यानुसार तिच्या सुरक्षित निवासाची व्यवस्था करण्यात आली असून समुपदेशन, शिक्षण आणि पुनर्वसनाबाबत पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असताना विवाह करणे, त्याचे आयोजन करणे अथवा त्याला मदत करणे हा कायद्याने दंडनीय अपराध आहे. त्यामुळे अशा घटनांकडे दुर्लक्ष न करता नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे. परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांना किंवा १०९८ या चाईल्डलाईन क्रमांकावर कळवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, पोलीस हवालदार अजय झुंजार, महिला पोलीस नाईक आरती पवार तसेच गोपनीय विभागातील कर्मचारी व अन्य पोलीस अंमलदारांनी केली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी कारवाई करणाऱ्या पथकाचे कौतुक केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हनी ट्रॅपचा सापळा टाकून शिवसेना जिल्हाप्रमुखाकडे २० लाखांची खंडणी

संबंधित बातम्या