कामगार हॉस्पिटलसाठी सातारा येथे भूखंड मंजूर

खासदार उदयनराजे भोसले यांची माहिती

by Team Satara Today | published on : 05 March 2025


सातारा : सातारा येथे एमआयडीसी मधील सुमारे 20 हजार स्क्वे.मिटरचा एमआयडीसीचा एएम-23 नंबरचा प्लॉट, एक रुपया प्रति स्क्वेअर मिटरप्रमाणे, ईएसआयसी हॉस्पिटल करीता देण्याचे धोरणात्मक निर्णय झाला आहे. दि.28 फेब्रुवारी रोजी पत्राद्वारे एमआयडीसीने, ईएसआयसी हॉस्पिटल, मुंबई च्या व्यवस्थापनास कळविले आहे. कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य हिताकरीता उभारण्यात येणार्‍या ईएसआयसी हॉस्पिटलच्या उभारणीस त्यामुळे गती मिळाली आहे, अशी माहिती सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.याबाबत अधिक माहीती देताना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे की, विकसनशीलतेकडून विकासाकडे सातारा जिल्हा झेपावत आहे. सातारच्या दोन एमआयडीसी तसेच लोणंद, खंडाळा, शिरवळचा पट्टा, कराड इ.औदयोगिक वसाहतीमध्ये तसेच अन्य औदयोगिक क्षेत्रात अनेक कामगार कार्यरत आहेत. या कामगारांचा ईएसआय पगारातुन कपात होत असतो. त्याबदल्यात कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य विषयक समस्यांवर मार्ग काढण्याचा मोठा आधार मिळत असतो. कामगारांची संख्या विचारात घेवून सन 2022 मध्ये केंद्राकडे हॉस्पिटलचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. केंद्राकडून सातार्‍यासाठी यापूर्वीच म्हणजेच सन 2023 मध्ये ईएसआयसी हॉस्पिटल मंजूर करुन घेण्यात आले आहे.ईएसआयसी हॉस्पिटल करीता, एमआयडीसी मधील पुरेशी जागा देखिल निश्चित करण्यात आली होती. परंतु एमआयडीसीने बाजारभावाप्रमाणे शासनाने रक्कम भरावी अशी अट प्लॉट वितरीत करताना घातली. बाजारभावाप्रमाणे रक्कम भरणे शासनास शक्य असले/नसले तरी सुध्दा एका महामंडळाकडून दुसर्‍या महामंडळाला जागा उपलब्ध करुन देण्यासाठी बाजारभावाचा हा द्राविडी प्राणायाम करण्याची गरज नाही अशी ठोस भुमिका आम्ही मांडली. त्यामुळेच याबाबत पूर्नविचार होवून, आता रुपये एक प्रतिस्क्वेअर मिटर अशी प्रिमियम रक्कम निश्चित करण्यात आली आहे. तसे ऑफर लेटर एमआयडीसी कडून ईएसआयसी कडे पाठविण्यात आले आहे. त्यामुळे सातार्‍यात एएम-23 या सुमारे 20 हजार स्क्वे.मिटरच्या जागेवर सुसज्य ईएसआयसी हॉस्पिटल उभारण्यातील मोठा अडसर दूर झाला आहे.आता ईएसआयसी म्हणजेच कामगार राज्य विमा महामंडळाने, 15 दिवससात सिक्युरिटी डिपॉझिटची रक्कम रुपये 5 हजार आणि प्लॉटच्या अंतिम वितरणासाठी विहित नमुन्यातील अर्ज एमआयडीसीकडे सादर करुन, प्लॉटचे वितरण इत्यादी बाबी मुदतीत पार पाडणे अत्यंत गरजेचे आहे. याकामी ईएसआयसी चे व्यवस्थापनास आम्ही लवकरच सूचना देत आहोत. त्यामुळे या प्राथमिक बाबींची पूर्तता झाल्यावर एएम 23 हा सातारा एमआयडीसी मधील प्लॉटवर ईएसआयसी हॉस्पिटल उभारणेसाठी निधी प्राप्त करुन घेणे आणि कामगारांना शक्य तितक्या लवकर सुसज्य वैदयकिय सेवा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येतील असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कळविले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंडाळ्यानजीक कालव्यात तरुणाचा आढळला मृतदेह
पुढील बातमी
शेतकरी संघटनेच्या इशार्‍याने जिल्हा प्रशासनाची धावपळ

संबंधित बातम्या