सातारा : जग अधिकाधिक डिजिटल होत असताना वाचनसंस्कृती कमी होण्याची भीती असताना पुस्तकांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले आहेत. मराठी पुस्तकांच्या वाचकांची संख्या वाढताना दिसत आहे, परंतु ही पुस्तके वाचकांना उपलब्ध करुन देण्यात वाचनालयातील पुस्तक सेवकांचाही मोठा वाटा आहे. वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी सहाय्य करणाऱ्या सातारा नगरवाचनालयातील पुस्तक सेवकांचा सत्कार मसाप, शाहुपुरी शाखेच्यावतीने जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून करण्यात आला.
मसाप, शाहुपूरी शाखेने स्थापनेपासूनच नेहमीच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. त्याचप्रमाणे हा एक कौतुकास्पद उपक्रम जागतिक पुस्तक दिनानिमित्त घेण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी च्या वतीने पुस्तकामध्ये राहणारे, पुस्तकांची सेवा करणारे आणि पुस्तकांव्दारे साहित्याची सेवा करणारे नगरवाचनालयातील पुस्तक सेवकांचा सत्कार करण्यात आला. शाखेचे संस्थापक अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, कोषाध्यक्ष सचिन सावंत, शाहूपुरी शाखेचे मार्गदर्शक, कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ साहित्यिक डॉ. उमेश करंबेळकर यांच्या हस्ते नगर वाचनालयाच्या पुस्तक सेवकांचा पेढ्याचा पुडा, पुस्तक आणि फुल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.