फलटण : फलटण नगर परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सगुणामाता नगर येथील 'रामराजे उद्याना'चे नाव बदलून 'संत सगुणामाता उद्यान' करण्याच्या प्रस्तावावर जोरदार चर्चा झाली. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीसह एकूण २१ महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली. या सभेत उद्यानाच्या नामकरणावरून सदस्यांमध्ये मतमतांतरे पाहायला मिळाली, तसेच शहरातील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांना थेट कारवाईचा कडक इशारा दिला.
सगुणामाता नगर येथील साई मंदिरासमोरील उद्यानास सध्या 'रामराजे उद्यान' असे नाव असून, या उद्यानाला 'संत सगुणामाता उद्यान' असे नाव देण्याचा प्रस्ताव अशोक जाधव यांनी दिला होता. सौ. मंगलादेवी नाईक निंबाळकर यांनी या प्रस्तावाचे वाचन केले तर किरण राऊत यांनी त्याला अनुमोदन दिले. दरम्यान, पांडुरंग गुंजवटे यांनी या उद्यानाला माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे नाव देण्याची मागणी केली. मात्र, खाजगी संस्थांना यापूर्वीच त्यांचे नाव दिले असल्याने सरकारी उद्यानाला संत सगुणामाता यांचे नाव देण्यास विरोध नसावा, अशी स्पष्ट भूमिका नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी मांडल्याने हा विषय चर्चेत राहिला.
सभेत शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा पंकज पवार यांनी उपस्थित केला असता नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले. पुढील सभेपूर्वी अतिक्रमण न काढल्यास थेट घरी बसण्याची वेळ येईल, असा थेट इशारा त्यांनी दिला. याशिवाय शहरातील मोकळ्या भूखंडांच्या स्वच्छतेवरून विकास काकडे, सचिन अहिवळे आणि पांडुरंग गुंजवटे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावर संबंधित भूखंड मालकांना नोटीस पाठवून त्यांनी स्वच्छता न केल्यास नगरपरिषद स्वतः स्वच्छता करेल आणि त्याचा खर्च करात समाविष्ट करेल, असा निर्णय घेण्यात आला. पाणीपुरवठा विभागासाठी जेसीबी भाड्याने घेण्याच्या विषयावरूनही सभागृहात मोठा वाद रंगला.
या संपूर्ण सभेत विरोधी गटातील स्वीकृत नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचे मौन सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. मागील सभांमध्ये अत्यंत आक्रमक भूमिका घेणारे श्रीमंत अनिकेतराजे यांनी या सभेत एकाही विषयात सहभाग घेतला नाही. गटनेते पांडुरंग गुंजवटे उपस्थित असतानाही अनिकेतराजे शांत राहिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
या विशेष सभेत आगामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त शहरात दर्शन बारी, हिरकणी कक्ष आणि स्वच्छतेसह १९ कामांना मंजुरी देण्यात आली. तसेच शहरात छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, महाराणी सईबाई आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य पुतळे उभारण्याच्या प्रस्तावांना एकमताने मान्यता देण्यात आली. अल्पसंख्याक विकास योजनेंतर्गत अहिंसा मैदान निवारा शेड व कुरेशी नगरमधील विकासकामांना मंजुरी देतानाच, शहरातील २१ खुल्या जागा नगरपरिषदेच्या नावे हस्तांतरित करण्याची प्रक्रियाही मार्गी लावण्यात आली. उन्हाळ्यातील पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेता जुने हातपंप दुरुस्त करणे, नवीन बोअरवेल घेणे आणि गोळीबार मैदान येथे पाच लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यास संमती देण्यात आली असून काळूबाई नगर येथील टाकी तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.