सातारा : अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोष यामध्ये सातारकरांनी रिमझिम त्या पावसात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला सातारा शहरातील 38 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणराय बुधवार नाका येथील विसर्जन तलावासह वेगवेगळ्या तलावांवर विसर्जन करण्यात आले.
सातार्यात ज्येष्ठ मंडळींनी थेटसनदशीर मार्गाचा लढा उभारल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बीला फाटा देत पारंपारिक वाद्यांवर भर दिला. हे मनोहारी दृश्य अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला विसर्जन मिरवणुकीत पाहायला मिळाले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते शनिवार पेठेतील प्रकाश मंडळाच्या शंकर-पार्वती गणरायाच्या पूजनाने मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकांच्या स्वागतासाठी मोती चौक, मारवाडी चौक तसेच विसर्जन मिरवणूक मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. गणेशोत्सव मंडळांनी मिरवणुका आणि त्याचे प्रबोधनपर देखावे यांनी आपले लक्ष वेधून घेतले. वाहतुकीच्या नियमनासाठी कमानी हौद ते राजवाडा गोलबाग हा रस्ता बॅरिकेट लावून बंद करण्यात आला होता. तसेच मोती चौक ते बुधवार नाका या परिसरातील रस्ते मिरवणुकीच्या निमित्ताने प्रतिबंधित करण्यात आले होते.
सातार्यात गेले दहा दिवस चाललेले पूजा पाठ, धार्मिक कार्यक्रम, प्रबोधनात्मक देखावे, भव्य दिव्य मंडप, आकर्षक सजावटी यामुळे चैतन्य पसरले होते. लाडक्या बाप्पांची मनोभावे आराधना करून शनिवारी सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तींना भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. अनंत चतुर्दशीच्या मुख्य दिवशी मिरवणुकीवर पडणारा ताण त्यामुळे पोलिसांची होणारी ससेहोलपट हे टाळण्याकरिता शनिवारी पूर्वसंध्येलाच 38 गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते बुधवार नाक्याच्या दिशेने शिस्तबद्ध पद्धतीने मार्गस्थ झाले. मोती चौकाकडून थेट बुधवार नाका व तेथून बसपा पेठेतून बुधवार पेठ परिसरातील कृत्रिम तळ्याकडे मिरवणूक मार्गस्थ झाली. तेथे नगरपालिकेच्या 40 कर्मचार्यांची फौज सज्ज होती. विसर्जन मिरवणुकीसाठी 84 फुटी तलावाची व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणूक सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी विसर्जन मार्गावर 200 पोलीस कर्मचारी व तीन पोलीस अधिकारी यांची नेमणूक होती. या सर्व बंदोबस्ताची उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा राजीव नवले यांनी पाहणी केली. मिरवणुकीतील सहभागी असणार्या गणेशोत्सव मंडळांवर ड्रोन च्या माध्यमातून लक्ष ठेवले जात होते. कोठेही दोन मंडळांच्या मिरवणुकीत आंतर पडेल याची काळजी घेण्यात आली. तसेच ध्वनीवर्धक यंत्रणांवर लक्ष ठेवून त्याचे मापन करण्यासाठी सातारा शहर व शाहूपुरी च्या चार पथकांकडे पाच डेसिबल मीटर यंत्रणा सज्ज होत्या. मात्र या मिरवणुकीमध्ये बहुतांश मंडळांनी पारंपारिक देखावे आणि पारंपारिक वाद्य यांनाच पसंती दिली. रात्री साडे अकरापर्यंत या विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.