अखिल भारतीय किसान सभेच्या अधिवेशनात 'कसेल त्याची जमीन'चा बुलंद नारा; शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एल्गार

by Team Satara Today | published on : 12 May 2026


सातारा  : शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करत अखिल भारतीय किसान सभेचे १५ वे सातारा जिल्हा अधिवेशन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. 'कसेल त्याची जमीन'चा बुलंद नारा देत देवस्थान इनाम जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर विनामोबदला करण्यात यावी, अशी ठाम मागणी या अधिवेशनात करण्यात आली. ऊसाला प्रतिटन ५५०० रुपये एफआरपी देण्याची मागणीही यावेळी जोरदारपणे मांडण्यात आली.

सोमवार, दि. ११ मे रोजी दुपारी १ वाजता कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वरकर नगर आणि कॉम्रेड जे. एस. पाटील (अजिंक्य कॉलनी) सभागृह, सातारा येथे हे अधिवेशन पार पडले. अधिवेशनाची सुरुवात लाल झेंड्याला पुष्पांजली अर्पण करून आणि लाल सलामी देऊन करण्यात आली. त्यानंतर किसान सभेचे राज्याध्यक्ष कॉ. उमेश देशमुख यांचे अरुण देशमुख यांनी स्वागत केले.

राज्याध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. ऊसाला प्रतिटन ५५०० रुपये एफआरपी मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच देवस्थान इनाम जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन हस्तांतरित करण्यासाठी गेली वीस वर्षे सुरू असलेल्या लढ्याला यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.


सरकारने इनाम जमीन शेतकऱ्यांच्या नावावर करण्यासाठी नवीन कायदा करण्याचे मान्य केले असले, तरी त्यात अनेक अटी व शर्ती घालून शेतकऱ्यांना जमिनीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न  सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. या संदर्भात ५ जूनपर्यंत हरकती नोंदविण्याची मुदत असून सर्व शेतकऱ्यांनी सज्ज होऊन हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

''वडिलोपार्जित तीन पिढ्यांनी रक्ताचे पाणी करून कसलेली जमीन शेतकऱ्यांच्या नावावर झालीच पाहिजे. 'कसेल त्याची जमीन' या धोरणानुसार देवस्थान इनाम जमीन विनामोबदला शेतकऱ्यांच्या नावे करण्यात यावी,'' अशी ठाम भूमिका अधिवेशनात मांडण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्यावतीने आनंदी अवघडे यांनी शुभेच्छा दिल्या. या अधिवेशनात  नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी माणिक अवघडे, सचिवपदी संजय घाडगे, उपाध्यक्षपदी राजेंद्र माने, सहसचिवपदी रामभाऊ जाधव आणि खजिनदारपदी हरुण शेख यांची निवड करण्यात आली. तसेच ११ सदस्यीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात 15 मे पासून दिलीपराज ग्रंथोत्सव ; दिलीपराज प्रकाशनची सर्वोत्कृष्ट पुस्तके 35 टक्के सवलतीत
पुढील बातमी
एम.आर.पी. च्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा ; अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

संबंधित बातम्या