झेडपीसाठी ८ तर पंचायत समितीसाठी १ अर्ज दाखल; उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी; राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले

by Team Satara Today | published on : 19 January 2026


सातारा : सातारा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २0२६ साठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या जोरात सुरू असून, राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. उमेदवारांसह राजकीय पक्ष आणि अपक्ष इच्छुकांमध्ये हालचालींना वेग आला असून निवडणूक रिंगणात उतरायची तयारी सुरू झाली आहे.

निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १९ जानेवारी अखेर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ८ नामनिर्देशन अर्ज, तर पंचायत समिती निवडणुकीसाठी १ नामनिर्देशन अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अर्ज दाखल होण्याचा वेग आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे नामनिर्देशन अर्ज विक्रीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दि. १७ जानेवारी अखेर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी एकूण २२० नामनिर्देशन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानंतर दि. १९ जानेवारी रोजी एकाच दिवशी १२६ अर्जांची विक्री झाली. त्यामुळे आतापर्यंत एकूण ३४६ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे. राजकीय पक्षांसह अपक्ष इच्छुकांनीही मोठ्या प्रमाणावर अर्ज घेतल्याने निवडणूक लढतीची उत्सुकता वाढली आहे. उमेदवारांकडून गटागटांतील राजकीय समीकरणे तपासली जात असून, कोणत्या गटातून कोण उमेदवारी दाखल करणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील टप्प्यांत अर्ज दाखल करणे, छाननी, माघारी आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार असून त्यानंतरच निवडणूक चित्र स्पष्ट होणार आहे. सातारा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून येत्या काळात राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सोनगाव येथील बंगल्यांवर खासदार उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्या गोपनीय वाटाघाटी; आमदार महेश शिंदे यांच्याशी सुद्धा उदयनराजे यांची चर्चा
पुढील बातमी
सातारा शहरात कडक कारवाई; विना परवाना, विना नंबर प्लेट, फॅन्सी प्लेट व ट्रिपल सीटवर धडक; २९ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

संबंधित बातम्या