उंब्रज: ऊसदर जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धावरवाडी येथील जयवंत शुगर कारखान्यासमोर काटा बंद आंदोलन केले. कारखाना प्रशासनाने वरिष्ठांशी चर्चा करून तीन दिवसांत ऊसदर जाहीर करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले.
ऊस गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याने ऊसदर जाहीर करावा, या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी आंदोलन केले. ऊसदराचा निर्णय जाहीर होईपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
या वेळी कारखाना प्रशासनाच्या वतीने वैभव थोरात यांनी आंदोलकांशी चर्चा केली. वरिष्ठांशी चर्चा करून तीन दिवसांत ऊसदर जाहीर करण्याचे त्यांनी लेखी आश्वासन दिले. त्यानंतर संघटनेने आंदोलन स्थगित केले. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके, प्रदेशाध्यक्ष अनिल पवार,
जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव, कार्यकारिणी सदस्य अर्जुन साळुंखे, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, खटाव तालुकाध्यक्ष दत्तू घार्गे, कऱ्हाड उत्तर तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे, पाल शाखाध्यक्ष यशवंत गोरे, वसंतराव पाटील, निखिल पाटील, शंकर पाटील, शरद जगदाळे, सनी पाटील, दत्तात्रय थोरात यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. आता कारखाना प्रशासन दिलेल्या मुदतीत ऊसदर जाहीर करणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
धावरवाडी येथील जयवंत शुगर’समोरील वजन काटा पाडला बंद; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; ऊसदर जाहीर करण्याची मागणी
by Team Satara Today | published on : 23 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा