सातारा : सातारा जिल्हा परिषदेमार्फत 8 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद सातारा येथे जिल्हास्तरीय पेन्शन अदालतीचे आयोजन झेडपीच्या सीईओ याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. या अदालतीचे मुख्य उद्दिष्ट सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या पेन्शन विषयक अडीअडचणींचे निराकरण करणे होते.
या अदालतीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) निलेश घुले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती शबनम मुजावर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, लेखाधिकारी समाधान चव्हाण, उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे व हेमंत खाडे, अधिक्षक, शालेय पोषण आहार, शिक्षण प्राथमिक विभाग यांचे उपस्थितीत पार पडली. यावेळी विविध संवर्गाच्या सेवानिवृत्त संघटनेचे प्रतिनिधी व सुमारे 125 पेन्शनधारक उपस्थित होते.
पेन्शन अदालतीमध्ये पुढील विषयांवर चर्चा करण्यात आली. निवड श्रेणी, वरिष्ठ वेतनश्रेणी व प्रलंबित वेतनवाढीचे प्रश्न, निवृत्तीच्या तारखेपासून पेन्शन नियमितपणे म्हणजेच 1 तारखेस जमा होणे, गट विमा विषयक अडचणी, सेवानिवृत्तीनंतर 15 वर्षानंतर होणारे पेन्शन बदलानुसार तत्काळ कार्यवाही करणे. अंशराशीकरण, प्रलंबित भविष्य निर्वाह निधी प्रकरणे यावर चर्चा झाली. उपदान व सेवानिवृत्तीनंतर लाभ सेवानिवृत्त झालेनंतर लवकरात लवकर देणे. निवृत्तीवेतनधारकांचे 80 व 90 वर्षानंतर देण्यात येणार्या पेन्शनच्या नुतनीकरण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत चर्चा, प्रत्येक महिन्याला तालुकास्तरावर पेन्शन अदालतीचे आयोजन करणे.
यावेळी प्रशासनाच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. सदर जिल्हास्तरीय पेन्शन अदालतीसाठी सर्व तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी, प्रत्येक पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी व पेन्शन चे कामकाज पाहणारे लिपीक उपस्थित होते. त्याचप्रमाणे मुख्यालयातील सर्व भरती विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी, पेन्शनचे कामकाज पाहणारे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सेवानिवृत्ती संघटना प्रतिनिधींच्या मागणी व त्यांनी दिलेल्या सूचनांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत समक्ष अदालतीमध्ये संबंधित विभागांना कार्यवाहीबाबत सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे सेवानिवृत्तांना सर्व कार्यालयामध्ये सन्मानपूर्वक वागणूक देणेबाबत व त्यांचे प्रलंबित मागण्यांबाबत तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन देणेत आले.
या पेन्शन अदालतीद्वारे अनेक सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या प्रश्नांचे समाधान करण्यात आले. याबाबत कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रशासनाचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले. त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदर्शवत अशा सातारा जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या आनंदी सेवानिवृत्ती पेन्शन योजनेचे कौतुक सेवानिवृत्ती धारकांनी केले.