राष्ट्रवादीचे मनोजकुमार पोळ यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याचे आदेश; अ‍ॅड. किरण फाकडे यांची माहिती, रद्द ठरावांवरून पुन्‍हा कोर्टबाजी

by Team Satara Today | published on : 20 September 2026


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी पार पडलेल्या ठराव प्रक्रियेत एकूण आठ ठराव रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये माण व फलटण विकास सेवा सोसायटी मतदारसंघातील प्रत्येकी एक, नागरी सहकारी पतसंस्था मतदारसंघातील एक, तर औद्योगिक, विणकर, पाणीपुरवठा व ग्राहक संस्था मतदारसंघातील चार ठरावांचा समावेश आहे. दरम्यान, माण तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने राष्ट्रवादीचे मनोजकुमार पोळ यांच्या नावाने करण्यात आलेला ठराव रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणात पोळ यांना दिलासा मिळाला असून त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती त्यांचे वकील अ‍ॅड. किरण फाकडे यांनी दिली.
माण तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालक मंडळाचा कार्यकाल २०२२ मध्ये संपला होता. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीसाठी संस्थेने केलेला ठराव ग्राह्य धरता येणार नाही, असा निर्णय विभागीय सहनिबंधकांकडून घेण्यात आला होता. त्याविरोधात मनोजकुमार पोळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
सुनावणीवेळी पोळ यांच्यावतीने अ‍ॅड. किरण फाकडे यांनी बाजू मांडली. २०२२ मध्ये संचालक मंडळाची मुदत संपली असली, तरी संस्थेची निवडणूक घेण्यासाठी सहकार विभागाकडे मागणी करण्यात आली होती. मात्र, शासनाच्या विविध कारणांमुळे निवडणूक पुढे ढकलली गेली, असा युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर २०२६ मध्ये शासनाकडून माण तालुका खरेदी-विक्री संघावर प्रशासक नियुक्त करण्यात आला होता. या नियुक्तीलाही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी न्यायालयातून स्थगिती मिळवली होती. त्यामुळे पूर्वीचे संचालक मंडळच कार्यरत असल्याची बाजू अ‍ॅड. फाकडे यांनी न्यायालयासमोर मांडली.
या युक्तिवादानंतर उच्च न्यायालयाने मनोजकुमार पोळ यांच्या बाजूने निर्णय दिला असून त्यांचे नाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदार यादीत समाविष्ट करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधकांना दिल्याचे अ‍ॅड. फाकडे यांनी सांगितले. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पोळ यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केली आहे. त्यामुळे विरोधकांकडून या निर्णयाला पुढे आव्हान दिल्यास आपली बाजू ऐकून घेतल्याशिवाय एकतर्फी आदेश होऊ नये, यासाठी पोळ यांनी खबरदारी घेतल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर माण तालुका खरेदी-विक्री संघाचा ठराव सध्या तरी मनोजकुमार पोळ यांच्या बाजूने कायम राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोणते सात ठराव रद्द?
तिरकवाडी, ता. फलटण येथील सुरेखा भीमराव सोनवलकर यांचा तिरकवाडी विकास सोसायटी मतदारसंघातील करण्यात आलेला ठराव रद्द करण्यात आला. संबंधित संस्था संचालक थकबाकीदार असल्याने संचालकाचा ठराव करण्यात आल्याचे अपात्रतेचे कारण देण्यात आले आहे.
माण तालुक्यातील पळशी विकास सेवा सोसायटीच्या वतीने विष्णू खाडे यांचा ठराव करण्यात आला होता. मात्र, संस्थेच्या मंजूर उपविधीनुसार हा ठराव ग्राह्य नसल्याचे नमूद करून तो रद्द करण्यात आला.
कोपर्डे, ता. खंडाळा नागरी सहकारी पतसंस्था मतदारसंघातील कै. डॉ. सतीश शिंदे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने संतोष शिंदे यांचा ठराव करण्यात आला होता. मात्र, संस्थेच्या सभेचे इतिवृत्त अपूर्ण असल्याचे कारण देत हा ठराव रद्द करण्यात आला.
औद्योगिक, विणकर, पाणीपुरवठा व ग्राहक संस्था मतदारसंघातील रहिमतपूर येथील दिनकर माने, वडूज, ता. खटाव दादासाहेब गोडसे, फलटण येथील मोहम्मद बागवान, यशवंतराव रणवरे या सभासदांचा मृत्यू झाल्याने त्यांचा ठरावही रद्द करण्यात आला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यात 29 सप्टेंबर 2026 रोजी 17 ठिकाणी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्यांचे आयोजन
पुढील बातमी
भजनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रमुग्ध; निवासस्थानी गणेशोत्सवाची धामधूम; मोरयाच्या जयघोषात गौराई गणपतीचे विसर्जन

संबंधित बातम्या