सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरती प्रक्रियेला तूर्तास ब्रेक लागला असून, या भरतीवर तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेश कोल्हापूर विभागाचे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) यांनी दिले आहेत. यासंदर्भातील अधिकृत पत्र ३० मार्च २०२६ रोजी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बजावण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाचा सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग तसेच पुणे येथील सहकार आयुक्त व निबंधक यांच्या निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेबाबतचे एक प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात (याचिका क्र. १६९१) प्रलंबित आहे. या याचिकेवर अंतिम निर्णय होईपर्यंत भरती प्रक्रिया थांबविण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाने दिले आहेत.
विशेष म्हणजे, ही भरती प्रक्रिया २०२४ मध्ये ‘वर्कवेल इन्फोटेक प्रा. लि.’ या एजन्सीमार्फत राबविण्यात आली होती. मात्र, न्यायालयीन पेच निर्माण झाल्याने आता ही प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी लागणार आहे. या आदेशाची कडक अंमलबजावणी करून त्याचा अनुपालन अहवाल शासनासह कोल्हापूर येथील विभागीय सहनिबंधक कार्यालयाला सादर करणे बँकेवर बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून भरती निकालाच्या आणि पुढील प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये चिंतेचे व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.