सातारा : सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी, सर्वसामान्यांची बँक असा नावलौकिक प्राप्त असणाऱ्या जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतंर्गत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर डॉ. महेश कदम, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा, मनोहर माळी, सहाय्यक निबंधक सातारा जनार्दन शिंदे, यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षणार्थी उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.
जनता सहकारी बँकेने महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नुकतीच स्वीकारलेली असून या योजनेतंर्गत जिल्ह्यातील पहिला प्रशिक्षणार्थी रुजू करण्याचा बहुमान जनता बँकेस मिळाला. डॉ.महेश कदम यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेवून बँकेने चांगली प्रगती केली असून यापुढे ही असेच चांगले कामकाज करून बँकेच्या लौकिकात वाढ करावी या दृष्टीने बँकेच्या संचालक मंडळ सदस्य व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
मनोहर माळी यांनी जनता सहकारी बँक ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली असून बँकेने शाखा विस्ताराद्वारे प्रगती साधावी असे नमूद करून महाराष्ट्र शासनाच्या युवा प्रशिक्षण योजने अंतर्गत जास्तीत जास्त युवकांना प्रशिक्षणासाठी नियुक्ती द्यावी असे नमूद केले. बँकेचे भागधारक पॅनेल प्रमुख, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन, जेष्ठ संचालक विनोद कुलकर्णी यांनी बँकेच्या प्रगतीत व वाटचालीस सहकार खात्याचे नेहमीच सहकार्य व पाठबळ मिळाले असल्यामुळेच बँक सक्षम झाली असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत जास्तीत जास्त पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती देण्यात येईल, असे नमूद करून जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पोर्टल द्वारे अर्ज करण्याचे आवाहन केले.
यावेळी बँकेच्यावतीने डॉ. महेश कदम, मनोहर माळी, जनार्दन शिंदे यांचा पुष्पगुच्छ, शाल देवून यथोचित सत्कार बँकेचे चेअरमन, अमोल मोहिते, विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार यांनी केले. या कार्यालयास सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, सातारा तालुका राहुल देशमुख, सातारा जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी, बँकेचे जेष्ठ संचालक आनंदराव कणसे, माधव सारडा, अविनाश बाचल, रवींद्र माने, बाळासाहेब गोसावी, वजीर नदाफ, मच्छद्रिं जगदाळे, तज्ज्ञ संचालक राजेंद्र जाधव (सी.ए.) बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्या ॲड. श्रुती कदम, बँकेचे अधिकारी,सेवक वर्ग उपस्थित होता.