अजिंक्यतारा कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

हाय्येस्ट शुगर रिकव्हरी इन हाय रिकव्हरी एरीया राष्ट्रीय पुरस्कार जाहिर

by Team Satara Today | published on : 12 September 2026


सातारा : नॅशनल फेडरेशन न्यू दिल्ली, या देशस्तरावरील केंद्रीय शिखर संस्थेकडून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास सिझन सन 2025- 26 चा हाय्येस्ट शुगर रिकव्हरी इन हाय रिकव्हरी एरीया हा पुरस्कार जाहिर झाला आहे. विशेष म्हणजे 2025-26 चा हंगाम आव्हानात्मक असतानाही कारखान्याची कामगिरी उल्लेखनीय ठरल्याचे संघाने आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
आता पर्यंत अजिंक्यतारा कारखान्यास कारखान्याचे तांत्रिक गुणवत्ता, कार्यक्षमता व अत्युत्तम उत्पादन क्षमतेच्या आधारे देशस्तरावरून व राज्यस्तरावरून एकूण 32 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. सन 2025- 26 चा पुरस्कार केंद्रिय मंत्री महोदयांचे शुभहस्ते येत्या दि.22 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्ली, येथे आयोजित सोहळयात वितरण केला जाणार आहे. ही बाब सर्वांना अभिमानास्पद असून कारखान्याच्या वैभवामध्ये भर पाडणारी आहे. या पुरस्कारामुळे अजिंक्यतारा कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
यानिमित्ताने कारखान्याचे मार्गदर्शक संचालक नामदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, अजिंक्यतारा साखर कारखान्यास मिळालेल्या या पुरस्कारामध्ये संचालक मंडळाचे, सभासद, बिगर सभासद, सर्व ऊस पुरवठादार शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कामगार-कर्मचारी यांचा मोलाचा सहभाग आहे. संचालक मंडळामार्फत काटकसरीचे धोरण अवलंबून सभासदाभिमूख कारभार करण्यात येत असून, पारदर्शक कारभारामुळे व कारखान्याचे उत्कृष्ट व काटेकोर आर्थिक नियोजन, खर्चात असलेली काटकसर व सर्वांकडून मिळत असलेले बहुमोल सहकार्य यामुळे कारखाना प्रगती पथावर नेण्यास वाव मिळत आहे. सातारा तालुक्याचे भाग्य विधाते स्व. आम. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोंसले (भाऊसाहेब महाराज) यांच्या प्रेरणेने अजिंक्यतारा कारखान्याची उभारणी होऊन त्यांनी दाखवून दिलेल्या विकास वाटेने आपण मार्गक्रमण करीत आहोत. त्यांचे शुभाशिर्वादाने भविष्यातील विविध आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जाऊन यशस्वीतेची परंपरा कायम ठेवू.
कारखान्याचे चेअरमन  यशवंत हरी साळुंखे म्हणाले की, नामदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांचे रूपाने कारखान्यास खंबीर व कुशल नेतृत्व मिळाल्यामुळे कारखाना प्रगतीपथावर आहे आणि म्हणूनच अजिंक्यतारा कारखान्याची महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशपातळीवर सहकारातील आदर्श कारखाना म्हणून ओळख निर्माण झाली आहे. कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते म्हणाले की, अजिंक्यतारा कारखान्याचे संचालक मंडळ नेहमीच सभासद व कामगार कर्मचारी यांचे हिताचे निर्णय घेत आहे आणि म्हणूनच संस्थेचे काटकसरीचे धोरण व मुल्यवर्धित उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत. सदरचा हंगाम कमीत कमी दिवसामध्ये यशस्वीपणे कसा संपन्न होईल याबाबत नियोजन करण्यात आले आहे. सभासद, बिगर सभासदांनी या गाळप हंगामाकरीता कारखान्याकडे नोंद केलेला सर्वच्या सर्व ऊस आपल्याच कारखान्याकडे गळितास देण्याचे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गौरी-गणपतीच्या खरेदीला साताऱ्यात वेग

संबंधित बातम्या