खंबाटकी घाटात एसटी बस नादुरुस्त; पुणे-सातारा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

​टोल नाक्यांवर वसुलीत मग्न असलेल्या महामार्ग पोलिसांच्या निष्क्रियतेचा प्रवाशांना मनस्ताप

by Team Satara Today | published on : 18 April 2026


​सातारा : सातारा-पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात शनिवारी एक अनपेक्षित घटना घडल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. पुणे येथून कोल्हापूरकडे निघालेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस (क्रमांक MH 06 BW 0856) घाटाच्या मध्यभागी अचानक बंद पडली. या ब्रेकडाउनमुळे घाटातील रस्ता अरुंद होऊन वाहतूक केवळ एका लेनवरून सुरू आहे, ज्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे.

​गेल्या दोन दिवसांपासून सातारा टुडेने पुणे-बेंगलोर महामार्गावर कार्यरत असणाऱ्या महामार्ग वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला होता. खेड शिवापूर आणि आणेवाडी टोल नाक्यावर पोलिसांकडून वाहनांची तपासणी आणि दंड वसुलीचे सत्र सुरू असल्याने महामार्गावरील वाहतूक आधीच विस्कळीत झाली आहे. त्यातच विकेंड असल्याने रस्त्यावर वाहनांची संख्या प्रचंड असून, गेल्या दोन तासांपासून वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे. खंबाटकी घाटातील या कोंडीमुळे वाहनांच्या मैलोन्मैल रांगा लागल्या असून प्रवासी आणि वाहनचालक हवालदिल झाले आहेत.

​घाटामध्ये बस बंद पडल्यामुळे शेकडो गाड्या जागच्या जागी अडकून पडल्या होत्या. मात्र, टोल नाक्यांवरील कारवाईत व्यस्त असलेले महामार्ग पोलीस घटनास्थळी अत्यंत उशिरा पोहोचल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला. पोलिसांच्या 'लेटलतीफ' कारभारामुळे प्रवाशांचे हाल होत असताना, स्थानिक युवकांनी पुढाकार घेऊन पारगाव-खंडाळा डेपोतील ब्रेकडाउन पथकाला पाचारण केले. हे पथक घटनास्थळी पोहोचून बस दुरुस्त करण्याचे किंवा बाजूला हटवण्याचे प्रयत्न करत आहे, जेणेकरून दोन्ही लेन वाहतुकीसाठी खुल्या होतील.

​विकेंडमुळे अनेक कुटुंबे, पर्यटक आणि व्यावसायिक कामानिमित्त प्रवास करत असताना त्यांना तासनतास या कोंडीत अडकून पडावे लागत आहे. उशिरा पोहोचलेल्या महामार्ग पोलिसांनी वाहनचालकांना शांत राहण्याचे आवाहन केले असले तरी, प्रवाशांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर कडाडून टीका केली आहे. आणेवाडी आणि खेड शिवापूर टोल नाक्यावर विनाकारण गाड्यांची तपासणी करून वेळ घालवण्याऐवजी, पोलिसांनी शुक्रवार ते रविवार या काळात वाहतूक नियोजनावर लक्ष केंद्रित केले असते, तर जनतेला या भीषण कोंडीचा सामना करावा लागला नसता, अशी भावना व्यक्त होत आहे. .


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
समर्थ मंदिर परिसर ‘मोकळा’; नगरपालिकेची धडक कारवाई
पुढील बातमी
साताऱ्यात शिवसेनेचा एल्गार ; पालकमंत्री शंभूराज देसाईं करणार भाजपचा 'करेक्ट कार्यक्रम

संबंधित बातम्या