कराड : वन्यप्राण्यांची घुसखोरी रोखण्यासाठी अवैध प्रवाहित वीजपुरवठा जोडून शेताभोवती लावलेल्या प्रवाहित तारेच्या कुंपणाला स्पर्श झाल्याने युवकाचा मृत्यू झाला. संबंधित युवक मित्रासमवेत खेकडे पकडण्यासाठी गेला असता शिंगणवाडी परिसरात काल मध्यरात्री ही दुर्घटना घडली. श्रीकांत केशव पुजारी (वय १८, रा. येणके, ता. कराड) असे मृत युवकाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेने येणके गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत श्रीकांत पुजारी हा येणकेतील युवक मध्यरात्री शिंगणवाडी (कोळे) गावच्या हद्दीत बोरपट्टी नावाच्या शिवारात ओढ्याला खेकडे पकडण्यासाठी मित्रासमवेत गेला होता. भाऊसाहेब कराळे व सतीश कराळे हे दोघे मित्र त्याच्यासोबत होते. कोळ्यातील कुमार कृष्णा पाटील यांच्या शेतात गेल्यानंतर अवैध वीजपुरवठा जोडलेल्या लोखंडी प्रवाहित तारेला त्याचा स्पर्श झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला.
अन्य मित्र त्यामध्ये सुदैवाने बचावले. मित्रांनी त्याचा जीव वाचवण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. माहिती मिळताच मृत पुजारीच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. कोळे दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक एस. डी. भिलारी, हवालदार समीर कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. कऱ्हाडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.
सायंकाळी त्याच्यावर येणकेत अंत्यसंस्कार करण्यात आले. कोळे येथील कुमार पाटील यांच्या विरोधात पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. मृत पुजारी या युवकाचे कुटुंब मुळचे कर्नाटकमधील असून, रोजंदारीवर ते येणकेत अनेक वर्षांपासून स्थायिक आहे. आई-वडील व बहीण असा त्याचा परिवार आहे.