औंधला आजपासून नवरात्रोत्‍सव

यमाईदेवी देवस्थानतर्फे विविध धार्मिक कार्यक्रम

by Team Satara Today | published on : 22 September 2025


औंध : महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्‍थान असलेल्या ग्रामनिवासिनी, मूळपीठ निवासिनी श्री यमाईदेवी व राजवाड्यातील कराडदेवीच्या नवरात्रोत्‍सवानिमित्त उद्यापासून (सोमवार) शुक्रवार (ता. तीन ऑक्‍टोबर) अखेर औंध येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्‍याची माहिती श्री यमाईदेवी देवस्थानच्या प्रमुख विश्‍‍वस्‍त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिली.

देवस्थानतर्फे औंध येथील ग्रामनिवासिनी यमाईदेवी मंदिर व राजवाडा परिसरातील स्वच्छता, रंगरंगोटी तसेच विद्युत रोषणाईचे काम पूर्णत्वास आले आहे. मूळपीठ डोंगरावरील पायऱ्यांची व मंदिर परिसराची स्वच्छताही करण्‍यात येत आहे. त्याठिकाणीही मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली आहे.

सोमवारी येथील राजवाड्यामध्ये श्री कराडदेवीची गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते मखरात प्रतिष्‍ठापना केली जाणार आहे. यावेळी पुण्याहवाचन, मंत्रपुष्पांजली, महाआरती, महानैवेद्य आदी कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. नवरात्रोत्‍सव काळात सकाळी व रात्री महानैवेद्य, महाआरती, मंत्रपुष्पांजली, गजाननबुवा कुरोलीकर यांचे कीर्तन होणार आहे.

मंगळवारी (ता. ३०) सकाळी बारा वाजता नियमित पूजा झाल्यानंतर दुपारी चार वाजता येथील मूळपीठ डोंगरावर देवीच्या अष्टमी उत्सवानिमित्त यात्रा भरविली जाणार आहे. यावेळी हरिजागर यमाईदेवीची पालखीतून मिरवणूक व पूजा आरती, कुष्मांड पूजा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते व राजघराण्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

बुधवारी (ता. एक) घट उत्थापना, कुमार- कुमारी पूजन हे कार्यक्रम होणार आहेत. गुरुवारी (ता. दोन) विजयादशमी उत्सवानिमित्त राजवाड्यात शस्‍त्रपूजन केले जाणार आहे. त्याचबरोबर घरटी एका व्यक्तीस जेवणास निमंत्रित केले जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी सीमोल्लंघन मिरवणूक निघणार आहे.

यावेळी ‘श्रीं’ची पालखीतून मिरवणूक काढली जाणार आहे. वेशीवर आपटा पूजन, डबे लावून गोळीबार केला जाणार आहे. त्यानंतर ‘श्रीं’ची पालखी परत मंदिरात आणून उत्सवमूर्तीची मूळ जागी प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यानंतर कराडदेवीच्‍या दरबार हॉलमध्ये गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते ग्रामस्थ व मान्यवरांना सोने देण्याचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी (ता. तीन) लळिताचे कीर्तन, आरती, जोगवा मागून गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते मानकऱ्यांना श्रीफळ, बिदागी देऊन गुलाल उधळून उत्सवाची सांगता होणार आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्मृतीदिन हा केवळ दुःख व्यक्त करण्याचा क्षण नसून जीवनमूल्यांचे चिंतन करण्याचा दिवस : पूज्य भंते काश्यप
पुढील बातमी
साताऱ्याचे संमेलन निश्चित पथदर्शक ठरेल : प्राचार्य डॉ. लवटे

संबंधित बातम्या