कास : पुष्प पठार कासवर फुलांचे सडे बहरण्यास सुरुवात झाली आहे. लाल, पांढरी, निळी रंगछटा ठिकठिकाणी दिसू लागल्याने फुलांचा साज लेवून कास पर्यटकांच्या (Tourists) स्वागताला सज्ज झाले आहे. जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठाराच्या हंगामाचा प्रारंभ पाच सप्टेंबरपासून करण्यात आला. आतापर्यंत हजारो पर्यटकांनी कासला भेट देऊन फुलांच्या दुनियेचा आनंद घेतला आहे.
सध्या पठारावर काही ठिकाणी निळी टोपली कारस्वी, लाल तेरडा, पांढरे गेंद आणि कीटकमक्षी निळी सीतेची आसवे या फुलांची संमिश्र छटा पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर रानहळद (चवर), नीलिमा, दीपकांडी, मंजिरी ही फुलेही दिसत आहेत. त्यामुळे कासच्या विविधरंगी फुलांच्या दुनियेस हळूहळू बहर चढावयास सुरुवात झाली आहे.
कास परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. कासवरील जैवविविधता बहरण्यासाठी ऊन, पावसाचे संमिश्र वातावरण लागते; पण आताही पावसाची रिपरिप चालू असल्याने फुलांचा मोठा बहर येण्यास उशीर लागत आहे. या पावसाने अनेक फुलांच्या प्रजातींना फटका बसत आहे. विशेषत पहिल्या टप्प्यात आलेल्या टोपली कारवीची फुले मोठ्या प्रमाणात डावून गेली. पाऊस असाच राहिल्यास लाल- गुलाबी तेरड्यालाही फटका बसणार आहे. त्यामुळे पावसाने विश्रांती घेणे गरजेचे आहे.
कास पठार कार्यकारी समितीमार्फत पठारावर ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी विविध ठिकाणी नैसर्गिक झोपड्या बनवल्या आहेत. सध्या पावसाची संततधार सुरू असल्याने या झोपड्यांचा मोठा आधार पर्यटकांना होत आहे. नैसर्गिक साधनांचा वापर करून बनवलेल्या या झोपड्या पर्यावरणपूरक व आकर्षक आहेत.
कास पठारावर सद्यःस्थितीत चांगली फुले असून, पावसाने विश्रांती घेतल्यास येत्या आठ-दहा दिवसांत गालिचे तयार होतील. पर्यटकांनी गैरसोय टाळण्यासाठी www.kas.ind.in या संकेतस्थळावर बुकिंग करून आल्यास फुले पाहणे सोयीचे होईल. -प्रदीप कदम, उपाध्यक्ष, कास समिती