सातारा : 'सृहृदांचा गोतावळा' या पुस्तकातील व्यक्तीरेखांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. प्रा. संध्या चौगुले यांनी सामाजिक काम करताना आलेल्या अनुभवांचे पुस्तक लिहावे, अशी अपेक्षा ९९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
सदरबझारमधील हिरवाई प्रकल्पात प्रा. संध्या चौगुले यांनी लिहिलेल्या 'सुह्रदांचा गोतावळा' या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी झाले. त्यावेळी श्री. कुलकर्णी बोलत होते. श्री. कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अलका मांडके व दै. प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रा. संध्या चौगुले यांनी सामाजिक कार्यात झोकून देऊन काम केले. अनेक प्रकारचे संघर्ष केले. ज्या काळात मोबाईल व इतर कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा नव्हत्या त्याकाळात टू व्हिलरवरुन गावोगावी जाऊन संध्या चौगुले यांनी खेड्यांमध्ये अंतरबाह्य बद्दल घडवून आणत समाजासाठी मोठे योगदान दिले. हे काम करताना त्यांना भेटलेल्या चांगल्या माणसांचे चित्रण त्यांनी या पुस्तकात केले आहे. पण हे काम करताना त्यांना वेदना देणारी माणसेही भेटली. त्याला न डगमगता त्यांनी काम सुरू ठेवले. कै. पांडुरंग चौगुले यांचा पाठिंबा त्यांना होता. प्रा. संध्या चौगुले यांनी मिळवलेले यश पाहण्यासाठी आज ते नाहीत. आलेल्या चांगल्या अनुभवांबरोबरच हे सारे अनुभवही संध्या चौगुले यांनी लिहिले पाहिजेत, असे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.
संध्या चौगुले यांना काम करताना भेटलेल्या सुह्रदांच्या चांगुलपणाचे दर्शन या पुस्तकातून आपल्याला मिळते. समाजातील चांगुलपणा वाढण्यासाठी सर्वांनी हे पुस्तक वाचावे, असे आवाहन श्रीकांत कात्रे यांनी केले. प्रा. संध्या चौगुले यांनी समाजासाठी मोठं योगदान दिलं. हे काम करताना अनेक अडचणीवर त्यांनी मात केली. चांगल्या कामासाठी समाजाचे पाठबळही त्यांना मिळाले, असे सांगून डॉ. अलका मांडके यांनी या पुस्तकातून समाजाला चांगुलपणा व सकारात्मक दृष्टीकोन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
प्रा. संध्या चौगुले यांनी मनोगतात आपल्या कामाविषयी व लेखनाविषयी माहिती दिली. प्रशांत तरडे यांनी मनोगत व्यक्त केले. धनंजय चौगुले यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सविता कारंजकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. चित्रा दाभोलकर, मृणालिनी निगडे, डॉ. शुभा राऊळ, रश्मी भातखळकर, कमोडोर शिवाजी यादव आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते.