सातारा : आज दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा प्रांगणात भरत शिवाजी यादव (वय ३८), रा. सासपडे या व्यक्तीने घरगुती वादाच्या पार्श्वभूमीवर भावनिक तणावात येऊन कार्यालयातील ध्वजस्तंभावर (Flag Post) चढून घोषणाबाजी सुरू केली व खाली उतरण्यास नकार दिला.
सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी श्री. नागेश पाटील यांनी महसूल विभाग, पोलीस विभाग व अग्निशमन विभाग यांनी तात्काळ समन्वयाने कार्यवाही केली. व्यक्तीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ध्वजस्तंभाच्या खाली सेफ्टी नेट (Safety Net) लावण्यात आले, तसेच अग्निशमन वाहनावरील शिडीची व्यवस्था तत्काळ करण्यात आली.
दरम्यान, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीशी शांतपणे संवाद साधून त्याचे समुपदेशन केले. प्रसंगावधान व संयम दाखवत प्रशासनाने केलेल्या चर्चेमुळे संबंधित व्यक्तीस कोणतीही इजा न होता सुरक्षितरित्या खाली उतरविण्यात यश आले. सदर प्रसंगी प्रशासनाच्या तत्परता, नियोजनबद्ध कार्यवाही व विभागांमधील उत्कृष्ट समन्वयामुळे संभाव्य अनर्थ टळला असून कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पूर्णतः नियंत्रणात ठेवण्यात आली.