कोरेगाव विधानसभा मतदारसंघात पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियानाचा शुभारंभ; कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

by Team Satara Today | published on : 11 April 2026


कोरेगाव : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी आणि कार्यकर्त्यांना विचारधारेचे प्रभावी प्रशिक्षण देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियानाचा कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दिमाखदार शुभारंभ करण्यात आला. सातारारोड येथील यशोदीप हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रियाताई महेश शिंदे आणि पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या हस्ते या महाभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी मनीषा पांडे, सुचरिता कंडारकर, अश्विनी हुबळीकर, वाई पंचायत समितीच्या सदस्या सुरभीताई भोसले, जिल्हा उपाध्यक्ष अजय मांढरे, तालुकाध्यक्ष निलेश यादव यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, बुथ अध्यक्ष, शक्ती केंद्रप्रमुख, सरपंच-उपसरपंच आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना डॉ. शिंदे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानववाद आणि अंत्योदय या विचारांची आजच्या काळात अधिक गरज असल्याचे सांगितले. हे प्रशिक्षण महाभियान कार्यकर्त्यांना सक्षम करून राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मकरंद देशपांडे यांनीही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे, हा पक्षाचा मूलभूत ध्यास आहे, असे सांगत कार्यकर्त्यांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले.

या महाभियानात सोशल मीडियाचा प्रभावी वापर, केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना, एसआयआर संदर्भातील माहिती, योग सत्र, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी विविध योजना, तसेच मुख्यमंत्री सहायता निधी यासारख्या विषयांवर सत्रांचे आयोजन करण्यात आले. कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन देऊन त्यांच्या कौशल्य विकासावर भर देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप कोरेगाव विधानसभा मतदारसंघ प्रमुख भरत मुळे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रशांत पवार यांनी केले. तालुका सरचिटणीस अमोल माने यांनी आभार मानले.

हे महाभियान केवळ राजकीय उपक्रम नसून समाजसेवा आणि संघटन बळकटीकरणासाठी एक प्रभावी पाऊल ठरणार असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

अभियानाच्या यशस्वीतेसाठी कोरेगाव शहराध्यक्ष दीपक फाळके, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी शक्ती केंद्रप्रमुख, बुथ अध्यक्ष उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कर्करोग उपचार क्षेत्रात 'बीव्हीजी लाइफ सायन्सेस'चे आशादायी संशोधन : ‘संयुग ७’ची प्रभावी कामगिरी – डॉ. श्रीकांत माने
पुढील बातमी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब महाबळेश्वरमध्ये; दौरा पूर्णतः खासगी असल्याची माहिती

संबंधित बातम्या