सातारा : पुणे येथील दिग्विजय प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने गेल्या 25 वर्षांपासून ‘इक्वेस्ट्रियन हॉर्स रायडिंग’चे प्रशिक्षण दिले जात आहे. संस्थेचे संचालक गुणेश पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिवचरित्र प्रसार अश्वमोहीम’ सध्या राज्यभर सुरू आहे. या मोहिमेतर्गत महाराष्ट्रातील 25 ऐतिहासिक किल्ल्यांना अश्वारोहण करत भेट दिली जात आहे.
या मोहिमेची सुरुवात 17 एप्रिल रोजी शिवनेरी किल्ल्यावरून झाली असून, समारोप 10 मे रोजी रायगड येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर अश्वारोहक रविवारी, दि. 26 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता साताऱ्यात दाखल होणार आहेत.
साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे या अश्वारोहकांचे भव्य स्वागत आयोजित करण्यात आले आहे. माननीय राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पना राजे भोसले यांच्या आशीर्वादाने तसेच खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते स्वागत समारंभ पार पडणार आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील तात्या काटकर आणि सातारा नगरपरिषद उपनगराध्यक्ष डी. जी. बनकर उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर सायंकाळी 5 वाजता ‘प्रस्थान समारंभ’ होणार असून, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडेल. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते व नगरसेवक श्री. अविनाश कदम उपस्थित राहणार आहेत. प्रस्थानानंतर अश्वारोहक किल्ले अजिंक्यतारा मार्गे सज्जनगडाकडे प्रस्थान करणार असून, नागरिकांनी या दोन्ही कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.