सातारा : येथील जिल्हा परिषद परिसरात असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या आप्पासाहेब पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बांधकाम सुरु असून आज सकाळी पॅसेजमधून वर्गाकडे निघालेल्या एका विद्यार्थिनीच्या अंगावर मोठे लोखंडी ग्रील पडल्याने ती गंभीर जखमी झाली. मात्र, या घटनेवेळी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्याची जबाबदारी शाळेने झटकल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत तिच्या पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, पालक स्कूलच्या प्राचार्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करणार असून बेजबाबदार प्राचार्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवार, दि. 23 रोजी आराध्या नागेश साळुंखे (रा. शाहूनगर, सातारा) ही आप्पासाहेब इंग्लिश स्कूलमध्ये शिकणारी विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. यावेळी 9.30 च्या दरम्यान, ती शाळेतील पॅसेजमधून वर्गाकडे निघाली होती. त्यावेळी सुरु असलेल्या बांधकामातील लोखंडी ग्रील तिच्यावर पडले. तिचा आरडाओरडा ऐकून तीन चार शिक्षक धावत आले व तिच्या अंगावर पडलेले लोखंडी ग्रील मोठ्या प्रयत्नाने दूर केले. या घटनेमध्ये तिच्या खांद्याला फ्रॅक्चर झाले. तिला प्रचंड वेदना होत होत्या.
तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल हे शाळेचे प्रथम कर्तव्य होते. मात्र, शाळेने आर्याच्या पालकांना फोन केला. त्यानंतर तिची आई घाबरलेल्या स्थितीत तातडीने शाळेत पोहोचली. यामध्ये तासाभाराचा कालावधी गेला. यावेळेत आर्या प्रचंड घाबरली होती. वास्तविक शाळेने तिला तातडीने उपचारासाठी दाखल करुन मग पालकांना कळवायला हवे होते. मात्र, शाळा पालकांची वाट पहात राहिली हे प्रचंड संतापजनक आहे. सुदैवाने तिचे जखमी होण्यावर निभावले, तिच्या जीवाचे काही बरे वाईट झाले असते तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल तिचे वडील नागेश साळुंखे यांनी केला आहे.
आराध्या प्रचंड घाबरली होती
आराध्याच्या अंगावर ग्रील पडल्यानंतर ती प्रचंड घाबरली. तिचा व इतर विद्यार्थिंनीचा आरडाओरडा ऐकल्यानंतर मग शिक्षक तिथे पोहोचले. त्यांनी ते जड ग्रील बाजुला केला. त्यावेळी आराध्याला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. तिच्या खांद्याला वेदना होत होत्या. वास्तविक तिला तातडीने शाळेच्या आजुबाजुला असलेल्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये दाखल करता आले असते. मात्र, शाळेने पालकांना घटना कळवली. त्यानंतर मग तासाभराने पालक आले. माझ्या मुलीच्या खांद्यावर हेयर क्रॅक पडले आहेत. तिला मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे. एप्रिल महिन्यात सुद्धा महाराष्ट्र शासनाचे जास्त गर्मी असल्यामुळे गरज असले तरच काम बाहेर पडा असे निर्देश असताना शाळेने उन्हामध्ये स्पोर्ट ऍक्टिव्हिटी सुरू ठेवल्या. त्यात माझ्या मुलीला उन्हाचा स्ट्रोक बसला आणि तिला निरामय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. तेव्हा सुद्धा मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते, असे नागेश साळुंखे यांनी सांगितले.
प्राचार्य व शिक्षकांना अक्कल शिकवण्याची गरज
आर्याच्या अंगावर लोखंडी ग्रील पडल्यानंतर ते उचलण्यासाठी तीन ते चार शिक्षकांना प्रयत्न करावे लागले. या घटनेत तिच्या खांद्याला फ्रॅक्चर झाले आहे. पालकांनी तिला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरु आहे, सुदैवाने तिची प्रकृती स्थिर आहे. मात्र, अशा प्रकारे बांधकाम सुरु असताना शाळेने काळजी घेणे आवश्यक होते. बांधकाम सुरु असताना तिथे मुलांचा वावर असेल तर तिथे प्राचार्यांनी काळजी घेण्यासाठी प्रयत्न करणे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र, घटना घडल्यानंतर प्राचार्यांनी पालकांचा फोनचा उचलला नाही. त्यामुळे नागेश साळुंखे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पोलीस ठाण्यात तक्रार करणार : नागेश साळुंखे
गेली दोन वर्षे शाळेचे बांधकाम चालू असताना लहान मुलांची शाळा सुरू आहे. संबंधित शाळा प्रशासन व बांधकाम ठेकेदार लहान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. तिथे मुलांचा वावर असतो हे माहिती असून मोठे लोखंडी ग्रील पडण्यासारख्या स्थितीत ठेवले गेले असेल तर हा प्रचंड मोठा निष्काळजीपणा आहे. शाळेच्या प्राचार्याने कामावर लक्ष ठेवून याबाबत काळजी घेणे गरजेचे होते. मात्र, तसे झालेले नाही. लोखंडी ग्रील अंगावर पडल्यानंतर तातडीने विद्यार्थिनीला हॉस्पिटलमध्ये दाखल न करता पालकांची वाट पहात रहाणे हा शाळेचा बेजाबदारपणा असून त्यानंतर पालकांचा फोन न उचलता जबाबदारी टाळणाऱ्या शाळा व प्राचार्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे नागेश साळुंखे यांनी सातारा टुडेशी बोलताना सांगितले.
प्राचार्यांनी मोबाईल कॉल घेतला नाही
नेमकी वस्तुस्थिती जाणून घेता यावी यासाठी प्राचार्यांना आमच्या प्रतिनिधीने मोबाईलवर कॉल केला. मात्र, प्रतिनिधींचा कॉल देखील उचलला गेला नाही. प्राचार्य हे जबाबदारीचे पद आहे. त्यांना येणारे कॉल हे शाळेच्या अनुषंगाने येणार हे माहिती असून जर पालकांचे देखील कॉल अशा प्रकारे टाळत असतील तर मग त्यांच्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची गरज पालकांमधून व्यक्त होत आहे.