आता २५ दिवसांनी करता येणार गॅस सिलिंडरचे बुकिंग; बुकिंगवरील निर्बंध केंद्र सरकारने शिथिल केले, ग्रामीण ग्राहकांना मोठा दिलासा

by Team Satara Today | published on : 09 September 2026


पुणे : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजीच्या पुरवठ्यावर झालेला परिणाम आणि सिलिंडरची वाढलेली प्रलंबित मागणी लक्षात घेऊन लागू करण्यात आलेले बुकिंगवरील निर्बंध केंद्र सरकारने शिथिल केले आहेत. नव्या निर्णयानुसार आता शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील ग्राहकांनाही मागील सिलिंडरनंतर २५ दिवसांचे अंतर पूर्ण झाल्यावर नवीन सिलिंडरचे बुकिंग करता येणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मध्यपूर्वेतील संघर्षामुळे फेब्रुवारीमध्ये एलपीजी पुरवठ्यावर दबाव निर्माण झाला होता. त्यामुळे मागणीचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने तात्पुरत्या स्वरूपात शहरी भागात २५ दिवस, तर ग्रामीण भागात ४५ दिवसांचे बुकिंग अंतर निश्चित केले होते. परिणामी ग्रामीण ग्राहकांना नवीन सिलिंडर बुक करण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत होती.
दरम्यान, एलपीजीचा पुरवठा सुधारला असून प्रलंबित सिलिंडर मागणीतही लक्षणीय घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ७ सप्टेंबर रोजी परिपत्रक जारी करून शहरी आणि ग्रामीण भागासाठी समान २५ दिवसांचे बुकिंग अंतर लागू करण्याचे निर्देश इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तेल विपणन कंपन्यांना दिले आहेत. सुधारित नियमाची तत्काळ अंमलबजावणी करण्यासही सांगण्यात आले आहे.
या निर्णयामुळे ग्रामीण भागासाठी असलेली ४५ दिवसांची प्रतीक्षा आता २५ दिवसांवर आली आहे. मात्र, २५ दिवसांचा कालावधी हा सिलिंडरच्या बुकिंगमधील किमान अंतर आहे. बुकिंगनंतर संबंधित गॅस वितरकाकडून उपलब्धतेनुसार सिलिंडर घरपोच दिला जाईल. शहरी आणि ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी ग्राहकांना आता समान नियमाने सिलिंडरचा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली. सिलिंडर वितरणातील पारदर्शकता आणि सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या ओटीपी अथवा डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोडद्वारे पडताळणी करणे आवश्यक राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे विशेषतः मोठी कुटुंबे तसेच एलपीजीचा वापर अधिक असलेल्या ग्रामीण कुटुंबांची गैरसोय कमी होणार आहे. शहरी आणि ग्रामीण ग्राहकांसाठी समान बुकिंग कालावधी लागू झाल्याने सिलिंडर वितरणातील तफावतही दूर होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'माझ्या भाषेचे निमित्त करून पळ काढू नका'; छ. संभाजीनगरच्या बैठकीत षड्यंत्र रचले, मनोज जरांगेंचा आरोप
पुढील बातमी
कराडमधील विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनी आक्रमक; हातात 'तिरंगा, फलक' घेऊन रस्त्यावर, घोषणाबाजी करत एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी

संबंधित बातम्या