फलटण प्रांताधिकाऱ्यांच्या नावे ५० हजारांची लाच घेताना खाजगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ अटक

by Team Satara Today | published on : 01 September 2026


फलटण : जमीन फेरफार अपिलातील विलंबमाफी अर्ज मंजूर करून अनुकूल निकाल देण्यासाठी फलटणच्या प्रांताधिकाऱ्यांच्या नावे ५० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या खाजगी एजंटला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी रंगेहाथ पकडले. विकास शंकर तोडकर (वय ३६, रा. नांदल, ता. फलटण) असे लाच घेताना ताब्यात घेतलेल्या खाजगी इसमाचे नाव आहे.
या प्रकरणातील तक्रारदार शेतकऱ्याची मौजे टाकळवाडे येथील वडिलोपार्जित शेतजमीन सहहिस्सेदाराने परस्पर विक्री केल्याचे निदर्शनास आल्यानंतर, त्यांनी फेरफार रद्द करण्यासाठी फलटण प्रांत कार्यालयात विलंबमाफीसह अपील दाखल केले होते. या कामाच्या पाठपुराव्यासाठी तक्रारदार प्रांत कार्यालयात गेले असता, ओळखीचा खाजगी एजंट विकास तोडकर याने प्रांताधिकारी श्रीमती आंबेकर यांच्याकडून फेरफार अपिलामधील विलंबमाफीचा अर्ज मंजूर करून तक्रारदाराच्या बाजूने निकाल मिळवून देण्यासाठी ५० हजार रुपये आणि निकालानंतर स्वतःसाठी १० हजार रुपये अशा लाचेची मागणी केली.
याबाबत तक्रारदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाने २५, २७ आणि ३१ ऑगस्ट रोजी गिरवी चौक येथे पंचांसमक्ष पडताळणी केली असता, तोडकर याने प्रांताधिकाऱ्यांच्या नावे वैयक्तिक प्रभाव पाडून ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ३१ ऑगस्ट रोजी गिरवी चौकातील लॉ कॉलेजसमोर रचलेल्या सापळ्यात विकास तोडकर याला ५० हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७(अ) नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक शैला कोरडे, पोलीस हवालदार नितीन गोगावले, निलेश राजपूरे, गणेश ताटे, महिला पोलीस नाईक प्रियंका जाधव आणि अजित कर्णे यांच्या पथकाने केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी व्हावे; ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन, विजेत्यांना आकर्षक पारितोषिके

संबंधित बातम्या