मुंबई : राज्यात मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे मोठे रॅकेट समोर आले आहे. परराज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी बनावट ई-मेल, दूरध्वनी क्रमांक आणि अधिवास प्रमाणपत्राच्या आधारे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) राबविल्या जाणाऱ्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीसाठी प्रवेश अर्ज भरल्याचे समोर आले.
हा प्रकार समोर आल्यानंतर सीईटी सेलने या विद्यार्थ्यांना त्यांची मूळ कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. त्यात एकाच विद्यार्थ्याने कागदपत्रे सादर केली आहेत. त्यामुळे सीईटी सेलकडून आता उर्वरित १५१ विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या पुढील फेऱ्यांमध्ये समाविष्ट होण्यास बंदी घातली जाणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार असून, त्याची माहिती मेडिकल कॉन्सिलिंग समितीकडे मागितली आहे.
‘त्यांच्या’ कागदपत्रांच्या तपासणीत काय दिसले?
सीईटी सेलने वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या फेरीची अस्थायी गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर नवीन इच्छुक विद्यार्थ्यांनीही नव्याने प्रवेश अर्ज भरण्याची संधी दिली. परराज्यातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र मिळवून प्रवेश प्रक्रियेत अर्ज सादर केल्याच्या तक्रारी सीईटी सेलकडे आल्या होत्या. सीईटी सेलने या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यामध्ये १५२ विद्यार्थ्यांनी चुकीची कागदपत्रे दिल्याचे समोर आले होते.
प्रमाणपत्रेही बनावट?
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या डोमासाईल प्रमाणपत्रावर दुसरीच नावे असणे, राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्राच्या फॉरमॅटमध्ये अथवा त्या अक्षरांप्रमाणे प्रमाणपत्र नसणे, तसेच प्रमाणपत्राचा अर्धाच भाग दिसणे अशा पद्धतीच्या त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यातून यातील काही प्रमाणपत्रे बनावट असण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तविली. मात्र, याबाबत विद्यार्थ्यांनी बाजू मांडल्यानंतरच अधिक स्पष्टता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नॅशनल मेडिकल कमिशनच्या प्रवेशाचे कार्य पाहणाऱ्या मेडिकल कॉन्सिलिंग समितीकडे (एमएमसी) सीईटी सेलने ईमेल पाठवून या सर्व १५२ विद्यार्थ्यांचा सर्व तपशील मागविला आहे. हा तपशील आल्यानंतर त्याची तपासणी केली जाईल. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती देण्यात आली.