मलकापूर : महामार्गाच्या सहापदरीकरण कामामुळे पाचवड फाटा व नारायणवाडी परिसरात शेतात पाणी साचून राहिल्याने होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या. आमदार डॉ. भोसले यांनी आज शासकीय अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड फाट्यालगतच्या नारायणवाडी परिसरात महामार्गाच्या कामामुळे तब्बल ९० हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्या ठिकाणी गटाराची उंची रस्त्यापेक्षा जास्त असल्याने पाणी साचून राहिल्याने पिकांचे नुकसान होते. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही संबंधितांकडून योग्य ती दखल घेतली जात नव्हती. या पार्श्वभूमीवर नाराज झालेल्या नारायणवाडीतील शेतकऱ्यांनी १४ ऑगस्टला आंदोलन छेडण्यासह आत्मदहन करण्याचा निवेदनाद्वारे प्रांत व तहसीलदारांना इशारा दिला होता.
त्याबाबतची माहिती मिळताच आमदार डॉ. भोसले यांनी तातडीने नारायणवाडीत जाऊन आज शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांनी प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या पाहणीदरम्यान गटाराची उंची रस्त्यापेक्षा अधिक असल्याने पाणी निचरा होत नसल्याचे स्पष्ट झाले. यावर ताबडतोब उपाययोजना करण्यासाठी आमदार डॉ. भोसले यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी व स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली. पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या आवश्यक कामासाठी केंद्र सरकारकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले. प्रस्ताव मंजूर होईपर्यंत तात्पुरत्या उपाययोजना म्हणून आजपासूनच आवश्यक मशिनरी उपलब्ध करून देण्याचे आदेशही महामार्ग प्राधिकरणाला दिले.
दरम्यान, अतिक्रमण किंवा स्थानिक समन्वयाच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदारांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना डॉ. भोसले यांनी केल्या. नारायणवाडी परिसरातील ग्रामस्थांना कुठल्याही परिस्थितीत अडचण येऊ देणार नाही, असे आश्वासन दिले.
यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, माजी सरपंच राजेंद्र देशमुख, रवी जाधव, दीपक देशमुख, शिरीष देशमुख, संदीप कदम, रणजित देशमुख, नथू पाटील, कृष्णात यादव, विश्वजित यादव यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.