सातारा : भारतीय जनता पार्टी विकास कामांच्या जोरावर आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे.अमुक एखादा उमेदवार माझ्याजवळचा म्हणून त्याला तिकीट दिले जाणार नाही. सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागामध्ये गटातटाचे राजकारण न पाहता सर्वसमावेशक आणि जिंकण्याची क्षमता असणारा उमेदवार दिला जाईल, अशी स्पष्ट ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
येथील लेक व्ह्यू हॉटेलमध्ये उमेदवारांच्या मुलाखतीचे दुसऱ्या दिवसाचे सत्र पार पडले दोन दिवसांमध्ये तब्बल बाराशे उमेदवारांनी आपली राजकीय इच्छा जाहीर केली आहे. या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाने चौदाशे हून अधिक नगरसेवक 25 नगरपालिकांमधून निवडून आणले आहेत त्यात यशाची आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पुनरावृत्ती करावयाची आहे .येथे गटातटाचे कोणतेही राजकारण नाही तसेच कोणी कोणाच्या जवळचा असेही काही नाही. गटातटाच्या राजकारणाला विराम देऊन सर्वसमावेशक आणि जिंकण्याची क्षमता असलेला उमेदवार दिला जाईल .जो उमेदवार निश्चित होईल त्याच्या मागे सर्वांनी एकजूट पणे उभे राहून भारतीय जनता पार्टीच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.
यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले निवडणूक प्रभारी धैर्यशील कदम, सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, कार्यकारणी सदस्य धनाजी पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास गोसावी, विठ्ठल बलशेठवार, माजी आमदार मदनदादा भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांना ना. जयकुमार गोरे यांचे थेट आव्हान
ना. जयकुमार गोरे म्हणाले, भारतीय जनता पार्टी आता कोणाच्या सांगण्यावरून थांबणारी पार्टी नाही. कार्यकर्त्यांनी अभेद्य एकजूट दाखवून आपापल्या गटातील उमेदवार निवडून आणावयाचे आहेत. पाटण तालुक्यामध्ये मोठ्या शक्तीशी आपला संघर्ष आहे. तेथे निधी कमी पडू दिला जाणार नाही. पालकमंत्री कोणीही असो तेथील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निश्चित ताकद दिली जाईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पाठीशी आहेत, असे थेट आव्हान जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना दिले.
जयकुमार गोरे व शिवेंद्रसिंहराजे यांची कमराबंद बैठक
शिवेंद्रसिंह राजे व जयकुमार गोरे या दोन कॅबिनेट मंत्र्यांची लेखी हॉटेलच्या दालनामध्ये कमरा बंद बैठक झाली. ही बैठक सुमारे वीस मिनिटे सुरू होती .सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपने कोणती रणनीती राबवायची तसेच गटाचे उमेदवार देताना कशा पद्धतीने परिस्थिती हाताळायची या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे मात्र या माहितीला दुजोरा मिळू शकला नाही.