सातारा : फलटण तालुक्यातील गुणवरे येथे गोठ्यात दूध काढण्याचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागल्याने 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
प्रियंका तानाजी कर्णे (वय 28) या पती तानाजी कर्णे यांच्यासह गायीचे दूध काढत होत्या. दूध काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मशीनला जोडलेल्या दुधाच्या कॅनचे झाकण त्यांनी लोखंडी पाईपला अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अचानक विद्युतप्रवाहाचा धक्का बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
पतीने तत्काळ त्यांना विद्युतप्रवाहापासून दूर करून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी तानाजी तात्याबा कर्णे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात खबर दिली असून, पोलीस नाईक अभंग पुढील तपास करीत आहेत.