सातारा : सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी देशातील तरुण पिढीचा 'झुरळ' असा उल्लेख केल्यानंतर देशभरातील तरुणाईमध्ये, विशेषतः 'जेन झी' (Gen Z) कम्युनिटीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावरून सुरू झालेल्या या जनआक्रोशाचे रूपांतर आता थेट एका नव्या राजकीय पर्यायात झाले असून, अभिजित दिपके या तरुणाने स्थापन केलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'ला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. सातारा जिल्ह्यातही या पक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, जिल्ह्यातील हजारो युवकांनी या पक्षाचे ऑनलाइन सदस्यत्व स्वीकारल्याने प्रस्थापित राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत. आतापर्यंत स्थानिक पुढाऱ्यांच्या मागे फिरणारा तरुण वर्ग या नव्या पक्षाकडे आकर्षित झाल्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरन्यायाधीशांचे वक्तव्य तरुण पिढीच्या तीव्र भावना दुखावणारे ठरल्याची चर्चा आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून ते राष्ट्रउभारणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर तरुणांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. असे असताना सर्वोच्च पदावरील व्यक्तीकडून झालेल्या या विधानामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'ला इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अवघ्या पाच दिवसांत तब्बल १२.२ मिलियन (सुमारे १ कोटी २२ लाख) फॉलोअर्स मिळाले आहेत. सोशल मीडियावरील हा आकडा देशातील अनेक प्रस्थापित राजकीय पक्षांच्या फॉलोअर्सच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक असल्याने या नव्या प्रवाहाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
देशातील तरुण पिढीमध्ये सध्याच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीबद्दल आधीच कमालीची अस्वस्थता आहे. मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती, इंधनाचे वाढते दर आणि महागाई यांमुळे सर्वसामान्यांना मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे, उच्चशिक्षित तरुणांच्या हाताला रोजगार नसल्याने अनेकांना परदेशाची वाट धरावी लागत आहे. अशा गंभीर परिस्थितीत प्रशासकीय आणि राजकीय पातळीवरून ठोस उपाययोजना करण्याऐवजी तरुणाईला 'झुरळ' म्हणून हिणवल्याने जखमेवर मीठ चोळले गेल्याची भावना तरुणांमध्ये निर्माण झाली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर अभिजित दिपके याने केवळ एका प्रतिक्रियेच्या स्वरूपात सुरू केलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'ने देशातील सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही आघाड्यांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. तरुणांना गृहीत धरणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेला आणि मुजोर राजकीय नेत्यांना या माध्यमातून थेट इशारा दिला गेला आहे. या पक्षाने उपरोधात्मक पद्धतीने तयार केलेल्या जाहीरनाम्याला (मॅनिफेस्टो) देखील देशभरातून पसंती मिळत आहे. सातारा जिल्ह्यात तर या मोहिमेला अभूतपूर्व गती मिळाली असून, पारंपरिक राजकारणात 'दादा, मामा, काका, भाऊ' म्हणून नेत्यांच्या मागे फिरणारा युवक आता स्वाभिमानाने या ऑनलाइन चळवळीत सहभागी होत आहे. तरुणाईचा हा वाढता कल पाहून साताऱ्यातील प्रस्थापित पुढाऱ्यांनी कॉकरोच जनता पार्टीचा मोठा धसका घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे.