डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन; सातार्‍यात संताप, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

by Team Satara Today | published on : 20 August 2026


सातारा : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे नेते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील दोषींना जामीन मिळाल्याच्या निषेधार्थ आज त्यांच्या 13व्या स्मृतिदिनानिमित्त सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी न्यायालयीन निर्णयाबाबत तीव्र संताप व्यक्त करत हत्येमागील सूत्रधार आणि व्यापक षडयंत्राचा लवकरात लवकर तपास करण्याची मागणी केली.

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात हत्या करण्यात आली होती. अंधश्रद्धा, जातिभेद, धर्मांधता आणि विवेकविरोधी प्रवृत्तींविरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढा दिला. त्यांच्या हत्येला 13 वर्षे पूर्ण झाली असतानाही या कटामागील सूत्रधार आणि व्यापक षडयंत्राचा पूर्ण उलगडा झालेला नसल्याबद्दल आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने दाभोळकर हत्या प्रकरणातील दोषसिद्ध आरोपींना जामीन देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्यांच्या शिक्षेविरोधातील अपील निकाली निघेपर्यंत त्यांना जामीन मिळाला आहे. या निर्णयावर दुःख आणि संताप व्यक्त करताना ऍड. वर्षा देशपांडे म्हणाल्या, खुनासारख्या गंभीर प्रकरणात दोषसिद्धीनंतरही आरोपींना जामीन मिळणे ही बाब योग्य वाटत नाही. न्यायालयाच्या या निर्णयाची आम्ही नोंद घेत असून, हत्येमागील सूत्रधार आणि त्यांचे व्यापक षडयंत्र याचा लवकरात लवकर शोध घ्यावा.

यावेळी दाभोळकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करत दोषींना कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा आणि हत्येच्या कटामागील सर्व सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
केबल जाळून तांबे विक्रीचा डाव फसला; वाई पोलिसांकडून दोघांना अटक; सुमारे 100 मीटर कॉपर केबल चोरीचा पर्दाफाश
पुढील बातमी
शाहूपुरी चौकाचा चेहरामोहरा बदलला; अतिक्रमणे जमीनदोस्त, पालिकेची धडक कारवाई

संबंधित बातम्या